

पुढारी ऑनलाईन डेस्क : परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने भारतीय शेअर बाजारात (Stock Market) सोमवारी (दि.२४) सलग सहाव्या सत्रात तेजी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ६५० अंकांनी वाढून ७७,५५० पार झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) २०० अंकांनी वाढून २३,५५० वर पोहोचला. बाजारातील तेजीत बँकिंग आणि आयटी शेअर्स आघाडीवर आहेत.
गेल्या शुक्रवारी (२१ मार्च) परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) एका दिवसात ७,४७० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. हा खरेदीचा आकडा चार महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठा आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. तर याच दिवशी देशांतर्गंत गुंतवणूदारांनी ३,२०२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.
सेन्सेक्सवर पॉवरग्रिड, कोटक बँक, एनटीपीसी, ॲक्सिस बँक, एसबीआय, एलटी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर टायटन, एम अँड एम, झोमॅटो, इन्फोसिस हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले आहेत.
क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस, ऑटो आणि आयटी निर्देशांक वाढले आहेत.