

Sensex Nifty 50 Today
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवर दुपटीने वाढवलेले टॅरिफ आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारातील भावना कमकुवत झाल्या आहेत. परिणामी, शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट) सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरून ८०,१२० वर आला. तर निफ्टी ५० निर्देशांक १४० अंकांच्या घसरणीसह २४,४६० च्या खाली आला.
सेन्सेक्सवर भारती एअरटेलचा शेअर्स सुमारे ३ टक्के घसरला आहे. त्याचबरोबर इन्फोसिस, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत. टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, कोटक बँक, टाटा स्टील, सन फार्मा या शेअर्समध्येही घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे टायटना शेअर्स १.६ टक्के वाढला आहे. एनटीपीसी, बजाज फायनान्स, आयटीसी, मारुती, इटरनल हे शेअर्सही तेजीत व्यवहार करत आहेत.
सेक्टरलमध्ये आयटी आणि फायनान्सियल शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टी आयटी १ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.५ टक्के घसरला आहे. मेटल, रियल्टी आणि ऑटो शेअर्समध्येही घसरण झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी व्यवहार सुरू होताच आशियाई शेअर बाजारांतील निर्देशांकांनी तेजी नोंदवली. आशियाई बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. पण भारतीय बाजारात ट्रम्प यांच्या टॅरिफचे पडसागद उमटू लागले आहेत.