पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील शुक्रवारच्या (दि.२१) अस्थिर सत्रात सेन्सेक्स, निफ्टी घसरून बंद झाले. सेन्सेक्स २६९ अंकांनी घसरून ७७,२०९ वर बंद झाला. तर निफ्टी ६५ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २३,५०१ वर स्थिरावला. विशेष म्हणजे आज IT शेअर्समध्ये जोरदार तेजी राहिली. क्षेत्रीय आघाडीवर आयटी, मेटल, मीडिया आणि टेलिकॉम ०.५-१ टक्क्यांनी वाढले, तर ऑटो, एफएमसीजी, पीएसयू बँक आणि रियल्टी ०.५-१ टक्क्यांनी घसरले.
शेअर बाजाराने आज दमदार सुरुवात केली होती. निफ्टी ५० नव्या उच्चांकावर खुला झाला होता. सेन्सेक्सची स्थितीही मजबूत होती. पण ट्रेडिंग सत्राच्या दुसऱ्या तासात बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आले आणि दोन्ही निर्देशांक घसरले. आजच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बेंचमार्क निर्देशांकांवर अचानक विक्रीचा दबाव दिसून आला. परंतु ट्रेडिंग सत्राच्या अखेरीस अंशतः नुकसान भरून निघाले. काही हेवीवेट्स शेअर्समधील विक्रीच्या दबावाने निर्देशांक खाली आले.
सेन्सेक्स आज ७७,७२९ अंकावर खुला झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात त्याने ७७,८०८ च्या अंकाला स्पर्श केला. पण त्यानंतर तो ७७,२०० पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, एलटी, टाटा स्टील, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, एसबीआय, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले. तर भारती एअरटेल, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, विप्रो, टीसीएस हे शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
एनएसई निफ्टीने (NSE Nifty 50) आज सुरुवातीच्या व्यवहारात २३,६६७ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर निफ्टी २३,५०० च्या खाली आला. निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, अदानी एंटरप्रायजेस, बीपीसीएल, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर भारती एअरटेल, LTIMindtree , अदानी पोर्ट्स, हिंदाल्को, इन्फोसिस हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले.
IT शेअर्स चमकले
निफ्टी आयटी आजच्या सत्रात सुमारे २ टक्क्यांनी वाढला. LTIMindtree, Persistent, इन्फोसिस, Coforge आणि टीसीएस हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. आयटी सेवा कंपनी Accenture ने त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वार्षिक महसूल वाढीचा अंदाज अपेक्षेपेक्षा अधिक वर्तवला आहे. यामुळे अमेरिकेच्या बाजारातील ट्रेडिंगमध्ये Accenture चे शेअर्स सुमारे ७ टक्क्यांनी वाढले. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आयटी शेअर्स तेजी दिसून आली.
हे ही वाचा :