पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी समुहाच्या शेअर्समधील (Adani Stocks) मोठ्या घसरणीचा फटका आज गुरुवारी भारतीय शेअर बाजाराला बसला. सेन्सेक्स आज ४२२ अंकांनी घसरून ७७,१५५ वर बंद झाला. तर निफ्टी १६८ अंकांच्या घसरणीसह २३,३४९ वर स्थिरावला.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात लाचखोरी (US bribery charges) आणि फसवणुकीचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. याचे पडसाद आज गुरुवारी (दि.२१) शेअर बाजारात उमटले. अदानी समुहातील काही कंपन्यांचे शेअर्स आज २० टक्क्यांपर्यंत घसरले. यामुळे अदानींच्या शेअर्सचे बाजार भांडवल २.२५ लाख कोटींनी कमी होऊन १२ लाख कोटींवर आले.
क्षेत्रीय निर्देशांकातील एनर्जी, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस, पीएसयू बँक, मीडिया, ऑटो, मेटल १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर रियल्टी निर्देशांक १ टक्के आणि आयटी निर्देशांक ०.५ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्के घसरला.
अदानींवरील आरोपानंतर अदानी समुहाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्संना फटका बसला. या आरोपांमुळे इक्विटी, बॉण्ड्स आणि संबंधित सिक्युरिटीजमध्ये मोठी घसरण झाली. ज्यामुळे बाजारातील भावनांवर त्याचा परिणाम झाला. एनएसई निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा (Adani Enterprises) शेअर्स २३ टक्क्यांनी घसरला. अदानी ग्रीन एनर्जी सुमारे १९ टक्के आणि अदानी एनर्जी सोल्यूशन्स २० टक्के घसरला. अदानी पोर्टस्, अदानी टोटल गॅस आणि अंबुजा सिमेंट्स हे शेअर्सही घसरले.
आजच्या सत्रात बँकिंग शेअर्सनाही फटका बसला. विशेषत : अदानी समुहाच्या कंपन्यांना कर्ज देणाऱ्यांना याची झळ बसली. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) या पीएसयू (PSU) बँकांचे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले. निफ्टी बँक ०.५ टक्के आणि निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक २.७ टक्क्यांनी घसरला.
एनएसई निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स आज तब्बल २३.४४ टक्क्यांनी घसरला. त्याचसोबत अदानी पोर्ट्सचा शेअर्स १३.२३ टक्के घसरून बंद झाला. एसबीआय लाईफ ३.१५ टक्के, एसबीआय २.७५ टक्के आणि एनटीपीसीचा शेअर्स २.५ टक्के घसरला. दुसरीकडे पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स तेजीत राहिले.