

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) बुधवारी (दि.५) जोरदार रिकव्हरी दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने (Sensex) ९०० अंकांची वाढ नोंदवली. त्यानंतर सेन्सेक्स ७४० अंकांनी वाढून ७३,७३० वर बंद झाला. तसेच निफ्टीच्या (Nifty) ऐतिहासिक १० दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. निफ्टी ५० निर्देशांक २५४ अंकांच्या वाढीसह २२,३३७ वर स्थिरावला. मुख्यतः आज आयटी, ऑटो आणि मेटल शेअर्स सर्वाधिक तेजीत राहिले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या सुरु असल्याने गेल्या काही दिवसांत बाजारात मोठी घसरण झाली. एकूणच जगभरातील बाजारात या ट्रेड वॉरची धास्ती दिसून आली. असे असतानाही आज भारतीय शेअर बाजारात आज तेजीचा माहौल राहिला.
निफ्टी ऑटो २.६ टक्के वाढला. निफ्टी आयटी २.१ टक्के वाढून बंद झाला. आयटीमध्ये कोफोर्जचा शेअर्स तब्बल ८.४ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. बीएसई मिडकॅप २.६ टक्के आणि स्मॉलकॅप २.८ टक्के वाढला.
निफ्टी ५० निर्देशांकावर अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, अदानी एंटरप्रायजेस, पॉवर ग्रिड, एम अँड एम हे शेअर्स ४ ते ५ टक्क्यांनी वाढले. तर बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी घसरले.
अमेरिका आणि त्याच्या व्यावसायिक भागीदारांदरम्यान वाढलेल्या टॅरिफ वॉरमुळे जगभरातील बाजारांत मोठा उलटफेर दिसून आला. पण अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला. मेक्सिको आणि कॅनडावर लागू केलेले शुल्क कमी केले जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. या त्यांच्या वक्तव्यानंतर जागतिक व्यापारातील अस्थिरता कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. ज्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला.
आशियाई शेअर बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळेही आज भारतीय बाजारातील तेजीला आधार मिळाला.