

अपघातानंतर विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा असते; परंतु अनेकदा विमा कंपन्या दाव्यास नकार देतात. अशा परिस्थितीत अनेकांना असहाय्य वाटते. सर्वप्रथम विमा कंपनीने तुमचा दावा का नाकारला आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
सध्याच्या काळात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. आपण कितीही काळजीपूर्वक वाहन चालवत असलो तरी इतरांच्या बेदरकारपणावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे वाहन चालवताना अपघातांची शक्यता ही नेहमीच असते. हल्ली बहुतेक जणांकडे- विशेषतः चारचाकी वाहन असणार्यांकडे वाहनविमा असतो. साहजिकच, अपघातानंतर विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा असते; परंतु अनेकदा विमा कंपन्या दाव्यास नकार देतात. अशा परिस्थितीत अनेकांना असहाय्य वाटते. मात्र, अशावेळी त्रागा करण्यापेक्षा किंवा घाबरून जाण्यापेक्षा योग्य नुकसानभरपाई मिळविण्यासाठी काही गोष्टींचे पालन करा.
सर्वप्रथम, विमा कंपनीने तुमचा दावा का नाकारला आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. विमा कंपनी तुम्हाला त्यासंबंधी लेखी कळवते. त्या पत्रातील कारणे काळजीपूर्वक वाचा. कधी कधी दावे नाकारण्यात काही चुकीचे कारण असते, तर काहीवेळा तुमच्या पॉलिसीच्या अटी आणि शर्तीमुळे तो नाकारला जातो. उदा. अपघाताच्या सर्व बाबी विमा कंपनीला न कळवल्यास किंवा तुमच्या पॉलिसीमध्ये काही बाबींचे संरक्षण नसल्यास दावा मंजूर केला जात नाही.
जर विमा कंपनी तुमचा दावा चुकीच्या कारणास्तव नाकारत असेल, तर तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्या. वाहन अपघातांशी संबंधित वकील विमा कंपन्यांच्या कामकाजाची चांगली माहिती ठेवतात आणि तुम्हाला योग्य नुकसानभरपाई मिळवून देऊ शकतात.
तुमच्या विमा पॉलिसीच्या सर्व अटी वाचा आणि अपघाताशी संबंधित कोणते संरक्षण दिले गेले आहे, हे स्पष्ट करा. त्यातील विशिष्ट अटी आणि शर्ती तुमच्या बाजूने असल्यास त्या विमा कंपनीसमोर सादर करा.
विमा दावा मंजूर व्हावा यासाठी योग्य पुरावे आवश्यक असतात. अपघाताचे फोटो, पोलिस अहवाल, वैद्यकीय नोंदी, साक्षीदारांचे जबाब, दुरुस्तीचे अंदाजित खर्च आदी सर्व माहिती व्यवस्थित संकलित करा. जितके अधिक आणि स्पष्ट पुरावे असतील, तितकी तुमची केस मजबूत होईल.
तुमच्या पॉलिसीचा आढावा घेतल्यानंतर आणि पुरावे गोळा केल्यानंतर विमा कंपनीशी संपर्क साधा. शांत आणि ठाम पद्धतीने संवाद साधा. विमा कंपनीला त्यांच्या निर्णयामागील कारण स्पष्ट करण्यास सांगा. त्यांना आवश्यक असलेली कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे तत्काळ पुरवा. याशिवाय, प्रत्येक संभाषणाची नोंद ठेवातारीख, वेळ, आणि कोणत्या प्रतिनिधीशी बोललात, याचा उल्लेख करा.
जर विमा कंपनी तुमच्या चर्चेनंतरही दावा मंजूर करीत नसेल, तर अधिकृत अपील करण्याचा पर्याय वापरा. बहुतेक विमा कंपन्यांकडे अपील प्रक्रिया असते. तुम्हाला दावा मंजूर का व्हावा, याचे सविस्तर स्पष्टीकरण असलेले पत्र तयार करा आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
जर विमा कंपनीने अन्यायकारक वागणूक दिली असे वाटत असेल, तर आपल्या राज्यातील विमा नियामक प्राधिकरणाकडे तक्रार करा. या शासकीय संस्थांचे काम विमा कंपन्यांवर देखरेख ठेवणे आणि ग्राहकांच्या तक्रारींची चौकशी करणे आहे. अनेकदा अशा तक्रारींमुळे विमा कंपनी निर्णय पुनर्विचार करण्यास भाग पडते. एक उपाय यशस्वी झाला नाही, तर दुसरा पर्याय निवडा. व्यावसायिक मदतीची आवश्यकता वाटल्यास वकीलांचा सल्ला घ्या. ही प्रक्रिया वेळखाऊ असू शकते; पण योग्य नुकसानभरपाई मिळविण्यासाठी ती आवश्यक आहे.