

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजाराने (Stock Market) मागील सत्रातील मोठ्या घसरणीतून सावरत आज शुक्रवारी (दि.२९) जोरदार कमबॅक केले. विशेषतः आज रिलायन्स, भारती एअरटेल आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स आज ७५९ अंकांनी वाढून ७९,८०२ वर बंद झाला. तर निफ्टी २१६ अंकांच्या वाढीसह २४,१३१ वर स्थिरावला.
निफ्टी फार्मा निर्देशांक २.३ टक्के वाढला. पीएसयू बँक निर्देशाकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. हा निर्देशांक ०.५ टक्के घसरला. निफ्टी बँकमध्ये किरकोळ वाढ दिसून आली, बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्के आणि स्मॉलकॅप ०.७ टक्के वाढून बंद झाला.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २९ नोव्हेंबर रोजी ४४६.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याआधी २८ नोव्हेंबर रोजी ते ४४२.९८ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आज बाजार भांडवलात ३.४९ लाख कोटींची वाढ झाली.
अदानी समुहातील सर्व १० शेअर्स आज वाढले. अदानी ग्रीन एनर्जी तब्बल २१ टक्क्यांनी वाढला. अदानी एनर्जी १५ टक्के वाढून बंद झाला. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात जणांवर अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात लाचखोर (US bribery charges) आणि फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आल्यानंतर अदानी समुहातील शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. पण आता त्यात रिकव्हरी झाली आहे.
निफ्टीवर भारती एअरटेलचा शेअर्स ४.४ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्यानंतर सन फार्माचा शेअर्स २.८ टक्के वाढला. सिप्ला २.६ टक्के, एम अँड एम २.५ टक्के आणि टाटा कन्झ्यूमर १.९ टक्के वाढला. तर दुसरीकडे पॉवरग्रिडचा शेअर्स १.३ टक्के घसरला.
सेन्सेक्सवरील आज ३० पैकी २७ शेअर्स तेजीत बंद झाले. त्यात भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.३ टक्के वाढ राहिली. तर पॉवरग्रिड शेअर्स १.२ टक्के घसरला. बीएसईवर आज वाढून बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक राहिली. आज यावर एकूण ४,०५० शेअर्समध्ये व्यवहार दिसून आला. त्यातील २,३३४ शेअर्स तेजीसह बंद झाले. १,६२३ शेअर्समध्ये घसरण झाली. तर ९३ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.