पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजार आज बुधवारी (दि. २३) सलग तिसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला. पण आज बाजाराला काल मंगळवारच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळाला. आज मोठी घसरण दिसून आली नाही. सेन्सेक्स १३८ अंकांनी घसरून ८०,०८१ वर बंद झाला. तर निफ्टी ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,४३५ वर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज खरेदी झाली.
क्षेत्रीयमधील आयटी निर्देशांक २.३ टक्क्यांनी वाढला. तर कॅपिटल गुड्स, पॉवर, फार्मा प्रत्येकी १ टक्के घसरले. बीएसई मिडकॅप ०.४ टक्के आणि स्मॉलकॅप ०.९ टक्के वाढला. जागतिक बाजारातील सुस्त संकेतांदरम्यान शेअर बाजारात आज सुरुवातीपासून बंद होईपर्यंत चढ- उतार दिसून आला.
सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर सन फार्मा, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, एलटी, आयसीआयसीआय बँक, टायटन, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, नेस्ले इंडिया हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले.
झोमेटॉचा शेअर्स आज सुरुवातीला (Zomato Share Price) १ टक्क्यांहून अधिक घसरला होता. पण सुरुवातीच्या घसरणीतून सावरत त्याने रिकव्हरी केली आण तो ३ टक्के वाढीसह बंद झाला.
परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या सततच्या विक्रीच्या माऱ्यामुळे बाजारात घसरण होत असल्याचे विश्लेषकाचे म्हणणे आहे.