पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बाँबे स्टॉक एक्सचेंजवर १ नोव्हेंबरला सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. या दिवशी हिंदू कालगणनेनुसार सामवत २०८१ची सुरुवात होत आहे. या दिवशी नियमित ट्रेंडिग होणार नाही, पण या एक तासात विशेष ट्रेडिंग होईल. तर सायंकाळी ५.४५ ते ६ वाजेपर्यंत प्री-सेशन होईल.
१९५७ पासून बाँबे स्टॉक एक्सचेंजमध्ये दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंग ठेवण्याची प्रथा आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर गुंतवणूक केली तर त्याचा लाभ पुढील वर्षभर होतो, या भावनेने मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जाते. (Diwali Muhurt Trading)
ऐतिहासिक दृष्टिकोनातून मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सकारात्मक परतावा मिळालेला आहे. मागील १७ पैकी १३ सेशन्समध्ये सेन्सेक्स हा वधारला होता. या दिवशी ट्रेडिंग व्हॉल्यूम मात्र कमी राहात असल्याचे दिसले आहे. अर्थात यालाही अपवाद आहे, याचे उदाहरण म्हणजे २००८मध्ये जागतिक मंदी असताना मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स ५.८६ टक्के वाढला होता.
२०१२पासूनचा अभ्यास केला तर १२ पैकी ९ सेशन्समध्ये सेन्सेक्स सकारात्मक बंद झाला होता. १२ नोव्हेंबर २०२३ला झालेल्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स ३५५ अंकांनी वाढला होता. पण मुहूर्त ट्रेडिंगनंतर पुढचे काही सेशन्स सकारात्मक राहतीलच, असे मात्र नसते. (Diwali Muhurt Trading)
गुंतवणुकदार, ट्रेडर्स, ब्रोकर्स यांच्यासाठी मुहूर्त ट्रेडिंगला विशेष महत्त्व आहे. हिंदू कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणून हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी गुंतवणूक केली तर समृद्धी लाभते अशी अनेकांची भावना आहे. हा सेशन वर्षाची नव्याने सुरुवात करण्याचा म्हणून पाहिला जातो.
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सहभागी होताना काही काळजी घ्यावी लागते. हे सेशन फक्त एक तासाचा असतो, त्यामुळे अस्थिरता जास्त असते. तसेच इंट्राडे पोजिशन्स सेशन संपण्यापूर्वी १५ मिनिटे आधी स्केअर ऑफ होतात, त्यामुळे वेळेचे भान ठेवावे लागते.