

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन दिवसांच्या तेजीनंतर भारतीय शेअर बाजार (Stock Market) शुक्रवारी (दि.७) अस्थिरता दिसून आली. दरम्यान, सेन्सेक्स ७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७४,३३२ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७ अंकांनी वाढून २२,५५२ वर स्थिरावला.
जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांदरम्यान देशांतर्गत शेअर बाजार आज लाल रंगात खुला झाला होता. त्यानंतर बाजारात चढ- उतार दिसून आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आयात शुल्क धोरणाची चिंता बाजारात कायम आहे. यामुळे गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. या पार्श्वभूमीवर आयटी निर्देशांक ०.९ टक्के घसरून बंद झाला. इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस हे शेअर्स १ टक्केहून अधिक घसरले. बीएसई मिडकॅप ०.३ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप ०.७ टक्के वाढून बंद झाला.
रिलायन्स तसेच मेटल कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीचा बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला. स्मॉलकॅप शेअर्समधील तेजीही कायम राहिली. पण आयटी आणि बँकिंग शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला.
सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स ३ टक्के वाढून टॉप गेनर राहिला. त्याचबरोबर नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, कोटक बँक, अदानी पोर्ट्स हे शेअर्सही तेजीत राहिले. तर दुसरीकडे झोमॅटो, इंडसइंड बँक हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांहून अधिक घसरले. एनटीपीसी, एचसीएल टेक, इन्फोसिस, टायटन, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले.
बीएसईवर आज तेजीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या अधिक राहिली. बीएसईवर एकूण ४,११४ शेअर्समध्ये व्यवहार दिसून आला. त्यातील २,५१२ शेअर्स तेजीसह बंद झाले. तर १,४६८ शेअर्समध्ये घसरण झाली. १३४ शेअर्स कोणत्याही चढ-उतारविना बंद झाले.