

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आज, ४ ऑक्टोबर पासून चेक क्लिअरन्सची प्रक्रिया जलद करण्यासाठी 'एक दिवसाचा चेक क्लिअरन्स' नियम लागू केला आहे. एका बाजूला हा नियम चेकचे पैसे तातडीने खात्यात जमा करणारा असला तरी, दुसऱ्या बाजूला फसवणूक रोखण्यासाठी (Fraud Prevention) असलेल्या 'पॉझिटिव्ह पे सिस्टीम' (PPS) चे नियम पाळणे आता सर्व चेक वापरकर्त्यांसाठी अनिवार्य बनले आहे.
एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) सारख्या बँकांनी ग्राहकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जलद क्लिअरन्समुळे आता एकही चूक महागात पडू शकते. त्यामुळे ग्राहकांनी PPS चे नियम काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत चेक क्लिअर होण्यासाठी किंवा मोठ्या रकमेचा चेक प्रोसेस होण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागत होता. आरबीआयच्या नव्या नियमामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि जलद झाली आहे.
सिंगल प्रेझेंटेशन सेशन (Single Presentation Session): आरबीआयच्या नवीन नियमानुसार, चेक सादर करण्याची (Present) आता एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे. यात, चेक प्राप्त करणाऱ्या बँकेला सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चेक स्कॅन करून 'क्लिअरिंग हाऊस'कडे पाठवावा लागेल.
सायंकाळी ७ पर्यंत कन्फर्मेशन (Confirmation): क्लिअरिंग हाऊस ही चेकची स्कॅन केलेली इमेज पैसे अदा करणाऱ्या बँकेकडे पाठवेल. त्यानंतर पैसे अदा करणाऱ्या बँकेला सायंकाळी १० ते ७ वाजेपर्यंत त्या चेकबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक पुष्टी (Positive or Negative Confirmation) देणे बंधनकारक आहे.
'आयटम एक्सपायरी टाईम': प्रत्येक चेकसाठी एक 'आइटम एक्सपायरी टाइम' निश्चित केला गेला आहे. या वेळेपर्यंत पुष्टी देणे आवश्यक आहे. यामुळे प्रक्रियेत होणारा अनावश्यक विलंब (Delay) थांबेल.
यामुळे चेकचे पैसे आता फक्त काही तासांतच खातेदाराच्या खात्यात जमा होतील.
चेक क्लिअरन्सची प्रक्रिया जलद झाल्यामुळे आता ग्राहकांना अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. चेक बाऊन्स (Cheque Bounce) होणे किंवा व्यवहारात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बँकांनी ग्राहकांना दोन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
चेक क्लिअर होण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने, खातेदारांनी चेकवर नमूद केलेली रक्कम खात्यात त्वरित आणि पूर्णपणे उपलब्ध असल्याची खात्री करावी. अपुऱ्या शिल्लकेमुळे (Insufficient Balance) चेक बाऊन्स झाल्यास नियमानुसार दंड (Penalty) आकारला जाऊ शकतो.
बँकांनी ग्राहकांना सुरक्षा वाढवण्यासाठी 'पॉझिटिव्ह पे सिस्टीम' (PPS) वापरण्याचे आवाहन केले आहे. ही प्रणाली विशेषतः ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
काय आहे PPS? यानुसार, तुम्ही ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक जारी करण्यापूर्वी, कमीत कमी २४ कार्य तास आधी बँकेला त्या चेकचा मुख्य तपशील (खाते क्रमांक, चेक क्रमांक, तारीख, रक्कम आणि लाभार्थीचे नाव) देणे अनिवार्य आहे.
बँक चेक क्लिअर करताना, चेकवरील आणि PPS द्वारे जमा केलेल्या माहितीची तुलना करते. दोन्ही माहिती जुळल्यास, चेक पुढे क्लियर केला जातो. यामुळे चेकची फसवणूक (Fraud) होण्याचा धोका पूर्णपणे टळतो.
आरबीआयचा हा नवा नियम बँकिंग व्यवस्थेत मोठी पारदर्शकता आणि कार्यक्षमता (Efficiency) आणेल, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य बँक ग्राहक या दोघांनाही मोठा फायदा होणार आहे.