

India Fuel Stock Update: देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची टंचाई निर्माण होणार का? मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध अफवा पसरत असताना केंद्र सरकारने या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयने सांगितलं आहे की, देशात इंधनाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून कोणत्याही प्रकारची कमतरता नाही.
सरकारने स्पष्ट केलं की देशातील सर्व पेट्रोल पंप आणि वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे. देशभरातील एक लाखांहून अधिक इंधन विक्री केंद्रे नियमितपणे सुरू असून कोणताही अडथळा न येता पुरवठा सुरू आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा रिफायनर आणि पेट्रोलियम उत्पादनाचा पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारत 150 हून अधिक देशांना रिफाइंड इंधन पुरवतो. म्हणून देशात पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
सध्या भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तेल कंपन्यांकडे पुढील 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आहे. एकूण क्षमता सुमारे 74 दिवसांची असून प्रत्यक्षात 60 दिवसांचा स्टॉक उपलब्ध आहे. यामध्ये कच्चं तेल, तयार उत्पादने आणि स्ट्रॅटेजिक रिझर्व्हचा समावेश आहे.
एलपीजीबाबतही सरकारने स्पष्ट केलं आहे की देशात कोणतीही टंचाई नाही. उलट, एलपीजी उत्पादनात 40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. देशाची रोजची गरज सुमारे 80 TMT (थाऊजंड मेट्रिक टन) असून सध्या 50 TMT उत्पादन होत आहे, जे पुरेस आहे.
अफवांमुळे काही काळ ग्राहकांनी घाईघाईत सिलेंडर बुकिंग केल्याने मागणी 89 लाख सिलेंडरपर्यंत पोहोचली होती. मात्र आता परिस्थिती स्थिर झाली असून दररोज सुमारे 50 लाख सिलेंडरची नियमित डिलिव्हरी होत आहे.
सरकारच्या मते, देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरक्षित आहे आणि कोणतीही टंचाई नाही. अफवांमुळे निर्माण होणारी भीती टाळणं आवश्यक आहे. जागतिक परिस्थिती अस्थिर असली तरी भारताने ऊर्जा पुरवठ्याच्या बाबतीत तयारी केली असल्याचा सरकारचा दावा आहे.