येत्या सप्ताहात निफ्टी 25000 चा टप्पा लीलया पार करेल, असे मागील सोमवारच्या लेखात म्हटले होते. त्याप्रमाणे निफ्टीने 25200 च्याही पुढे जाऊन 25268.35 चा नवा उच्चांक प्रस्थापित केला आणि अखेरीस 25235.90 वर बंद झाला. सेन्सेक्सने 82500 च्या पुढे मजल मारली. निफ्टी बँकेनेही सप्ताहात 163 पॉईंटस्ची वाढ दाखवलेली असली तरी तो आपल्या 53357.70 या उच्चांकापासून बराच खाली आहे.
सलग 12 दिवस तेजी दाखवण्याचा भारतीय बाजाराचा गेल्या 17 वर्षांतील हा पहिल्यांदाच विक्रम झाला, याचे बहुतांश श्रेय अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्याला जाते. जीडीपीमध्ये वाढ, जॉबलेस क्लेमस्मध्ये घट आणि परिणामी सप्टेंबर महिन्यात व्याजदर कमी होण्याचे फेडरल रिझर्व्हकडून मिळालेले संकेत या ती गोष्टींमुळे बाजार वर वर जात आहे. 25 बेसिस पॉईटंस्नी अमेरिकेतील व्याजदर कमी होतील, हा अंदाज बाजारात पक्का गृहीत धरला गेला आहे. त्याहूनही जास्त म्हणजे 50 बेसिस पॉईंटस्नी व्याजदर कमी झाले, तर सप्टेंबर महिना गुंतवणूकदारांची चांदी करून टाकेल.
ऑगस्ट महिन्यात 21368 कोटी रुपयांची निव्वळ विक्री-खरेदी केली. FIIS नी गत सप्ताहात पाचपैकी चार दिवस खरेदी केली. DIIS नी ऑगस्ट महिन्यात 48278 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना विशेषतः SIP द्वारा गुंतवणूक करणार्यांना मनःपूर्वक सलाम!
निफ्टी फार्मा (7.12 टक्के वाढ) आणि निफ्टी आयटी (4.82 टक्के वाढ) आणि या दोन निर्देशांकांनी बाजाराला विक्रम प्रस्थापित करण्यास मदत केली. फार्मामधील ग्रॅन्यूल्सचा शेअर ऑगस्ट महिन्यात स्टार ठरला. बावीस टक्के वाढून तो रु. 718.10 वर बंद झाला. ग्रॅन्यूल्सला लुपिन (रु. 2240.20) 20.28 टक्के वाढ, नॅटको फार्मा (रु. 1537.55) 14 टक्के वाढ, ऑसे फार्मा (रु. 1569.40) 12.14 टक्के वाढ आणि टोरेंट फार्मा (रु. 3485.15) 12 टक्के वाढ यांनी भक्कम साथ दिली.
जीएसपीएल (Gujarat State Petronet Ltd) गत आठवड्यात साडेबत्तीस टक्के वाढला. टाटा इन्व्हेस्ट ग्रॉडफ्रे फिलिप्स, जेएम फायनान्शिअलस् हे शेअर्सही पंधरा टक्क्यांहून अधिक वाढले. निफ्टीच्या तुलनेत निफ्टी बँक ऑगस्ट महिन्यात कमी वाढला. त्याला कारणीभूत सरकारी बँकांची सुमार कामगिरी. निफ्टी पीएसयू बँक ऑगस्ट महिन्यात 6 टक्के घसरला. इंडियन बँक, पंजाब & सिंध बँक, इंडियन ओव्हरसी बँक, युको बँक, महाराष्ट्र बँक, एसबीआय, युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक हे सर्व शेअर्स 5 ते 9 टक्के घसरले. अनियमित आर्थिक कामगिरी आणि सातत्याने खासगी बँकेकडे वळणारा Market Share ही दोन प्रमुख कारणे त्यापाठीमागे आहेत.
सरकारचा एक निर्णय शुक्रवारी जाहीर झाला आणि शुगर आणि इथेनॉल निर्मिती करणार्या कंपन्यांचे शेअर्स 13 टक्क्यांपर्यंत वाढले. इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस किंवा सिरप वापरण्यास साखर कारखान्यांना परवानगी, हा तो निर्णय दालमिया भारत आणि ग्लोबस स्पिरीटस् यांनी 52 Week High चा उच्चांक गाठला, तर बलरामपूर चिनी, प्राज इंडस्ट्रीज, श्री रेणुका शुगर्स, धामपूर शुगर, राजश्री शुगर्स, द्वारिकेश शुगर्स हे सर्व शेअर्स वाढले. यापुढेही कित्येक दिवस या सेक्टरमधील तेजी अशीच राहील, अशी शक्यता आहे.
आता शेवटी थोडे चिंतित करण्यार्या बातमीबद्दल! 2025 च्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीचा आकडा जाहीर झाला. तो आहे 6.7 टक्के! मागील वर्षाच्या याच तिमाहीतील आकडा होता 8.2 टक्के. तसेच मागील पाच तिमाहीतील हा सर्वात कमी आकडा आहे. बारा दिवसांची निफ्टी आणि सेन्सेक्सची विक्रमी घोडदौड सोमवारी या बातमीमुळे खंडित होईल काय? की बाजारातील प्रचंड रोखता (Liquidity) या बातमीवर मात करून बाजारास उंच उंच नेईल?