Nifty and Sensex : अर्थवार्ता

Stock Market
Stock Market
Published on
Updated on

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) निर्देशांकांनी मोठ्या प्रमाणात घसरण अनुभवली. निफ्टी व सेन्सेक्स अनुक्रमे 443.25 अंक व 1514.64 अंक घसरून 17671.65 अंक व 59306.93 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी 2.45 टक्के तर सेन्सेक्स 2.49 टक्के घसरणीसह बंद झाले. परदेशी गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने आपला नफा काढून घेण्यास प्राधान्य दिल्याने निर्देशांकांमध्ये घसरण झाली.

* फ्युचर रिटेल व रिलायन्स रिटेल यांच्या एकत्रिकीकरणास सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने लाल कंदील दाखवला. याविरोधात फ्युचर रिटेलने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. तरीदेखील उच्च न्यायालयाने सिंगापूर न्यायाधिकरणाचा निकाल रद्द करण्यास नकार दिला. यामुळे फ्युचर रिटेल व रिलायन्स रिटेलमधील 24713 कोटींच्या एकत्रिकीकरणाच्या (मर्जर) व्यवहारावर टांगती तलवार कायम आहे.

* केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवला आहे. आता ते डिसेंबर 2024 पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहतील. त्यांच्या कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण होणार होता; मात्र त्याआधीच केंद्र सरकारने फेरनियुक्तीचा निर्णय घेतला. कोरोना काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था सावरून धरण्याच्या त्यांच्या कामाची ही केंद्र सरकारने दिलेली पोचपावती आहे. (Nifty and Sensex)

* आयआरटीसीतर्फे ऑनलाईन टिकीट बुकिंगवर आकारण्यात येणार्‍या सुविधा शुल्क तासांच्या आत रद्द. सुविधा शुल्कामध्ये हिस्सा देण्याच्या निर्णयावर भांडवल बाजारात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सुमारे 70 हजार कोटींचे भांडवल बाजारमूल्य असलेला आयआरसीटीसीचा समभाग 25 टक्के कोसळला; परंतु निर्णयमागे घेत असल्याचे समजताच दिवसाच्या न्यूनतम पातळीपासून काहीसा वर येत दिवसाअखेर 7.42 टक्के घट होऊन बंद झाला. केवळ 150 ते 200 कोटींचा हिस्सा मिळवण्याच्या नादात भांडवल बाजारात खूप मोठी किंमत मोजावी लागल्यामुळे सरकारतर्फे हा निर्णय रद्द करण्यात आला.

* केंद्र सरकारची वित्तीय तूट गेल्या 4 वर्षांतील सर्वांत कमी असून अंदाजपत्रकीय तुटीच्या आकड्यापेक्षा 5 लाख 26 हजार कोटी किंवा 25 टक्के इतकी पहिल्या सहा महिन्यांत नोंदवली असून सदर तूट कमी होण्यास कर संकलनात झालेली वाढ ही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे.

* सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 7 टक्के घटला. मागील वर्षी 2184 कोटींचा नपा यावर्षी 2032 कोटी झाला. थकीत कर्जे व इतर कारणांसाठी कराव्या लागणार्‍या तरतुदींमध्ये 27 टक्क्यांची वाढ झाल्याने नफा घटला. या तिमाहीत 424 कोटींच्या तरतुदी (प्रोव्हिजन्स) करण्यात आल्या. निव्वळ व्याज उत्पन्न 3.18 टक्के वधारून 4021 कोटी झाले. निव्वळ अनुत्पादित कर्ज (नेट एनपीए) 0.64 टक्क्यांवरून 1.06 टक्क्यांपर्यंत वाढली.

* एफआरपी पेक्षा अधिक दर देणार्‍या साखर कारखान्यांना दिलासा. या कारखान्यांवर इन्कम टॅक्स आकारला जात होता. उत्पादनापेक्षा अधिक नफा असूनदेखील इन्कम टॅक्स भरला नसल्याचा ठपका सुमारे 150 कारखान्यांवर ठेवून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, परंतु एफआरपीपेक्षा अधिकचा दर म्हणजे निव्वळ नफा नसून हा पैसा शेतकरी व कामगारांवर खर्च करत असल्याचे साखर कारखाना संघाचे म्हणणे. यासाठी साखर कारखाना संघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु अखेर अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एसएमपी व एफआरपी यांच्यातील फरकावर इन्कम टॅक्स आकारला जाणार नसल्याचा निर्णय झाल्याने लवकरच केंद्राकडून कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे.

* चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत अ‍ॅक्सिस बँकेचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 86.16 टक्क्यांनी वधारून 1683 कोटींवरून 3133 कोटी झाला. तरतुदींमध्ये (प्रोव्हिजन्समध्ये) जबरदस्त घट. प्रोव्हिजन्स मागील वर्षीच्या तुलनेत 60.05 टक्के घटून 4343 कोटींवरून 1735 कोटी झाल्या. निव्वळ व्याज उत्पन्न 7.84 टक्के वधारून 7900 कोटी झाले. एकूण उत्पन्न 2.99 टक्के वाढून 20134 कोटी झाले. तसेच निव्वळ अनुत्पादित कर्जे (नेट एनपीए) प्रमाण 0.98 टक्क्यांवरून 1.08 टक्के झाले. (Nifty and Sensex)

* देशातील महत्त्वाची आयटी कंपनी 'टेक महिंद्रा'चा नफा सप्टेंबर अखेर तिमाहीत 26 टक्के वाढून 1339 कोटी झाला. कंपनीचा एकूण महसूल 16.1 टक्के वधारून 10881.3 कोटी झाला.

* चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मागील वर्षीपर्यंत गणले जाणारे जॅक मा यांच्या अलिबाबा उद्योग समूहाला घरघर. वर्षभरात उद्योग समूहाचे मूल्य तब्बल 344 अब्ज डॉलर्सनी घटले. मागील वर्षी चीनमधील सरकारवर टीकास्त्र डागल्यावर तेथील सरकारने या उद्योग समूहाविरुद्ध चौकशीचा ससेमिरा लावला.

* बंधन बँकेच्या तोट्यामध्ये वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत बँकेला 3008.59 कोटींचा तोटा मागील वर्षी असणार्‍या 920 कोटींच्या नफ्याच्या तुलनेत यावर्षीच्या तिमाहीत तोटा तरतुदींमध्ये (प्रोव्हिजन्स) तब्बल 13 पटींनी वाढ होऊन तरतुदी 5578 कोटी झाल्या. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण 0.36 टक्क्यांवरून 3.04 टक्के झाले. निव्वळ व्याज उत्पन्न 1923 कोटींवरून 1935 कोटी झाले.

* सरकारी स्टील कंपनी 'सेल'चा दुसर्‍या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 10 पट वाढून 436.52 कोटींवरून 4338.75 कोटी झाला.

* चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत आरबीएल बँकेचा नफा 78 टक्के घटून 31 कोटी झाला. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण मागील वर्षी असणार्‍या 3.34 टक्क्यांच्या तुलनेत 5.40 टक्के झाले. अनुत्पादित तसेच इतर कारणांसाठी करण्यात येणार्‍या तरतुदींमध्ये (प्रोव्हिजन्स) मध्ये 487 कोटींच्या तुलनेत वाढ होऊन तरतुदी 651 कोटींवर पोहोचल्या. निव्वळ व्याज उत्पन्न 2 टक्के घटून 915 कोटी झाले.

* 8 नोव्हेंबर रोजी खुला होणारा पेटीएमचा आयपीओचा किंमतपट्टा 2080-2150 रुपये निर्धारित करण्यात आला आहे. एकूण 18300 कोटींचा आयपीओ असून नोंदणी पश्चात बाजारमूल्य 1.48 लाख कोटींच्या जवळपास जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नायकाचा आयपीओ पहिल्या 2 दिवसांमध्ये 4.82 इतका सबस्क्राईब झाला.

* 22 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 908 दशलक्ष डॉलर्सनी घटून 640.1 अब्ज डॉलर्स झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news