

गेल्या आठवड्यातील बाजारावरचे औदासिन्याचे मळभ या आठवड्यात पूर्णपणे हटले आणि निफ्टीने 18000 चा टप्पा दिमाखात पार केला. जरी निफ्टीचा यापूर्वीचा सार्वकालिक उच्चतम आकडा (All time high) हा 18887 असला तरी 2022 मध्ये तो अठरा टक्के घसरला. जगभर वाढणारे, व्याजदर, रशिया, युक्रेन युद्ध आणि अगदी अलीकडे अमेरिकेतील काही ग्लोबल बँकांमुळे निर्माण झालेले आर्थिक पेचप्रसंग यामुळे जवळपास दीडवर्ष निफ्टी 18000 च्या खाली रेंगाळत होता. त्यामुळे हा टप्पा पार करणे भारतीय बाजाराला अत्यंत आवश्यक होते.
या आठवड्यातील भारतीय बाजारातील तेजी ही सर्वंकष होती. सर्व प्रमुख निर्देशांक सव्वा दोन ते सव्वा तीन टक्क्यांनी वाढले.
बीएसई सेन्सेक्स 61112.44 – 2.44 टक्के वाढ.
एनएसई निफ्टी 50 – 16065 – 2.50 टक्के वाढ.
निफ्टी मिडकॅप – 31794.55 – 3.23 टक्के वाढ.
निफ्टी बँक – 43233.90 – 2.64 टक्के वाढ.
निफ्टी FMCG (2.45 टक्के वाढ) आणि निफ्टी IT (3.30 टक्के वाढ) यांनी बाजाराच्या वाढीला या आठवड्यात मोठे योगदान दिले. रुपया डॉलर विनिमय दरामध्ये डॉलरचा भाव हळूहळू कमी होत असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIL) भारतीय बाजारातील खरेदी वाढत आहे. या आठवड्यात FIIS ची नक्त खरेदी होती रु. 5395.13 कोटी, तर DIIS ची खरेदी होती रु. 1974.25 कोटी. मागील सोमवारी म्हटल्याप्रमाणे महागाई दर (inflation rate) कमी येण्याची चिन्हे आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता. या दोन गोष्टी बाजाराला वरती नेत आहेत. कारण व्याजदर कमी झाले की रोकड सुलभता (Liquididity) वाढते.
इप्का लॅबोरेटरीजचे प्रवर्तक आणि कार्यकारी अध्यक्ष प्रेमचंद गोधा यांनी युनिकेम लॅब्जचे 33.38 टक्के शेअर्स 2034 कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषणा केली. युनिकेम लॅब्जच्या प्रवर्तकांपैकी एक प्रकाश मोदी यांच्या मालकीचे हे शेअर्स खरेदी केल्यावर इप्काचा शेअर 10 टक्के घसरला.
क्रॉम्पटन ग्रीव्हज या consumer durables क्षेत्रातील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू जॉब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि हा शेअर 12 टक्के कोसळला. वर्षभरातील नीचांक नोंदवूनही 45 पैकी ही 40 अॅनालीरुटसनी अजूनही या शेअरला Buy दर्जा दिला आहे आणि हा शेअर जवळपास 50 टक्के वाढेल, असे सांगितले आहे. शुक्रवारी हा शेअर रु. 254.90 वर बंद झाला.
मॅनकाईंड फार्माचा बहुचर्चित IPO गुरुवारी बंद झाला. रु. 4326 कोटींचा हा आयपीओ जवळपास साडेपंधरापट अधिक सबस्क्राईब झाला. परंतु रिटेल गुंतवणूकदारांकडून मिळालेला प्रतिसाद हा 92 टक्के होता. QIB (Qualified Institutional Buyers) नी 15 पटींनी, तर HNI (High Networth Individuals) नी जवळपास पावणेचार पट अधिक सबस्क्रीप्शन केले. आता प्रतीक्षा आहे Tata Technologies च्या आयपीओची.
ब्रिटानिया, आयटीसी, बजाज फायनान्स, स्टेट बँक, विप्रो, एल अँड टी हे शेअर या आठवड्यात पाच टक्क्यांपेक्षा अधिक वधारले. यापैकी आयटीसीने गेल्या एक वर्षात 64.21 टक्के, ब्रिटानियाने 38.25 टक्के, तर एल अँड टीने 39.29 टक्के परतावा शेअरधारकांना दिला आहे. आपण बाजारात मल्टी बॅगर्स शोधत वणवण हिंडतो. (Digitally) आणि जवळच्या हिर्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. एसबीआयने मागील एका वर्षात 16 टक्के परतावा दिला आहे. भारतातील या सर्वात मोठ्या पब्लिक सेक्टर बँकेवर जगभरातील संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विश्वास किती असावा. नुकतेच SBI ने आंतरराष्ट्रीय बाजारात पाच वर्षांच्या US Treasury Bonds Index ला प्रमाणभूत असणारे बाँडस विक्रीला काढले. त्याचा कूपन रेट हा बेंचार्क इंडेक्सपेक्षा (3.5 टक्के) 145 बेसिस पॉईंटनी अधिक होता. जगभरातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या बाँडस विक्रीला जोरदार प्रतिसाद दिला.
या निमित्ताने आपली गुंतवणुकीची दिशा अशी असावी, याबद्दल एक नम्र निर्देशन करावेसे वाटते. एसबीआयच्या शेअरची 2030 मधील प्रस्तावित लक्ष विविध बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार किामन रु. 4689 ते कमाल रु. 5859 असे दिले आहे. मे 2023 पासून आपण एसबीआयचे 10 शेअर्स दरमहा खरेदी करण्याचे ठरवले आणि कठोर आर्थिक शिस्त अंगी बाळगून ते तडीस नेले तर 2030 पर्यंत आपल्याकडे जवळपास 1000 शेअर्स होतील आणि त्यावेळी बाजारतज्ज्ञांचे लक्षनिर्धारण अचूक ठरले आणि एसबीआयच्या एका शेअरचा भाव रु. 5000 झाला तर, पण ही मार्केटमधील Volititity आहे ना. ती गुंतवणूकदारांच्या मानसिकतेच्या चिंधड्या उडवून टाकते.
आदित्य बिर्ला कॅपिटल लि. (AB Capital) ही आदित्य बिर्ला ग्रुपच्या फायनान्शिअल सर्व्हिसेस व्यवसायाची होल्डिंग कंपनी आहे. लाईफ इन्श्युरन्स, हेल्थ इन्श्युरन्स, जनरल इन्श्युरन्स, म्युच्युअल फंडस, वेल्थ मॅनेजमेंट, ब्रोकिंग आणि फायनान्स असा तिचा सर्वत्र संचार आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी 25 टक्के नफा वाढ असणार्या या कंपनीचे भवितव्य आशादायी आहे. शुक्रवारचा शेअरचा बंदभाव रु. 167 होता.
भरत साळोखे
संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.