

नीलेश पुजारी
प्राप्तिकर विभागाने मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी नवीन आयटीआर फॉर्म (विवरणपत्रे) अधिसूचित केले आहेत. या नवीन अर्जांमध्ये (आयटीआर 1 ते 7) अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, त्याचा थेट परिणाम करदात्यांवर होणार आहे.
प्राप्तिकर विभागाच्या नवीन आयटीआर बदलातील सर्वात मोठा बदल म्हणजे संपर्क माहिती आणि पत्त्याशी संबंधित असून, आता करदात्यांना प्राथमिक आणि दुय्यम माहिती देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आयटीआर फॉर्मच्या ‘भाग-अ’ मध्ये हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत करदात्यांना केवळ एक स्थायी पत्ता आणि एकच भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा लागत असे. मात्र, आता विभागाने प्राथमिक (प्रायमरी) आणि दुय्यम (सेकंडरी) अशी संकल्पना मांडली आहे.
पत्त्याचा नवीन रकाना : अर्जामध्ये मुख्य पत्त्यासोबतच ‘दुय्यम पत्ता’ देण्याचा पर्याय असेल. जे लोक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त वारंवार शहरे बदलतात किंवा भाड्याने राहतात, त्यांना आपला कायमस्वरूपी पत्ता आणि सध्याचा पत्ता असे दोन्ही तपशील नोंदवता येतील.
संपर्क माहिती : भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडीसाठी आता दोन रकाने असतील. प्राथमिक क्रमांकावर विभागाचे महत्त्वाचे संदेश येतील, तर दुय्यम क्रमांक आणीबाणीच्या वेळी किंवा बॅकअप म्हणून वापरला जाईल. यामुळे जुना क्रमांक बंद असला तरी विभागाशी संपर्क तुटणार नाही.
अनेकदा करदाते स्वतः आपले विवरणपत्र भरू शकत नाहीत, अशा वेळी चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कुटुंबातील सदस्य ‘प्रतिनिधी’ म्हणून विवरणपत्र भरतात. जुन्या नियमांनुसार अशा प्रतिनिधींना आपली विस्तृत माहिती द्यावी लागत असे; मात्र आता त्यांना केवळ तीन गोष्टींची माहिती द्यावी लागेल :
1. प्रतिनिधीचे नाव
2. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक
3. त्यांचा ई-मेल आयडी
शेअर बाजार किंवा मालमत्तेतून कमाई करणार्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नवीन अर्जांमध्ये ‘ड्युअल रिपोर्टिंग’ म्हणजेच दुहेरी माहिती देण्याची कटकट संपवण्यात आली आहे. मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी कर रचनेत कोणताही बदल झालेला नसल्यामुळे, करदात्यांना मालमत्ता हस्तांतरणाच्या तारखेनुसार वेगळा हिशेब देण्याची गरज पडणार नाही.
करदात्यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये केलेल्या कमाईचे हिशेब मूल्यांकन वर्ष 2026-27 मध्ये दिले जातात. हे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 असेल.