Mutual Fund SIP Investment: 5-6 SIP सुरू आहेत, पण एकाच शेअरमध्ये अडकलेत तुमचे पैसे; गुंतवणूकदारांनो, ही चूक करु नका

Mutual Fund SIP Portfolio Overlap: दर महिन्याला पाच-सहा म्युच्युअल फंडांमध्ये SIP सुरू असली, तरी तुमची गुंतवणूक खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण असेलच असे नाही.
Mutual Fund SIP Portfolio Overlap
Mutual Fund SIP Portfolio OverlapPudhari
Published on: 
Updated on: 

- शिवानी शेळके

Mutual Fund SIP Portfolio Overlap: दर महिन्याला पाच ते सहा म्युच्युअल फंडांमध्ये SIP सुरू आहे म्हणून तुमची गुंतवणूक सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण आहे, असे समजणे चुकीचे ठरू शकते. कारण वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये तुमचा पैसा एकाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवला जाऊ शकतो. त्यामुळे फंडांची संख्या वाढते, पण गुंतवणुकीत विविधता असेलच असे नाही.

अनेक गुंतवणूकदार वेगवेगळ्या फंड हाऊसच्या योजना निवडतात. त्यांना वाटते की प्रत्येक फंडात पैसे गुंतवल्यामुळे रिस्क कमी होते. मात्र, प्रत्यक्षात या योजनांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक समान कंपन्यांचे शेअर्स असू शकतात. त्यामुळे एकाच प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसा अडकण्याची शक्यता असते. म्हणून नेमक्या कोणत्या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक आहे, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांमध्ये एकाच कंपन्यांचे शेअर्स का असतात?

यामागे म्युच्युअल फंडांची गुंतवणूक पद्धत आणि सेबीचे नियम महत्त्वाचे आहेत. सेबीच्या वर्गीकरण नियमांनुसार, लार्ज कॅप फंडांना त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान 80 टक्के रक्कम बाजारमूल्यानुसार पहिल्या 100 कंपन्यांमध्ये गुंतवावी लागते.

त्यामुळे दोन वेगवेगळ्या फंड हाऊसचे लार्ज कॅप फंड असले, तरी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक समान कंपन्या असू शकतात. त्यातच एखाद्या गुंतवणूकदाराने फ्लेक्सी कॅप किंवा फोकस्ड फंड घेतला असेल आणि त्या फंडातही मोठ्या कंपन्यांचे शेअर्स जास्त असतील, तर समान गुंतवणुकीचे प्रमाण आणखी वाढू शकते.

अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराकडे पाच-सहा फंड असतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांची गुंतवणूक मोजक्याच कंपन्यांमध्ये असू शकते. त्यामुळे फंडांची संख्या वाढवण्यापेक्षा प्रत्येक फंडाची गुंतवणूक कुठे आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

तुमच्या म्युच्युअल फंडांमध्ये किती ओव्हरलॅप आहे?

दोन म्युच्युअल फंडांच्या पोर्टफोलिओमध्ये एकाच कंपन्यांचे शेअर्स आहेत का, एवढे तपासणे पुरेसे नाही. त्या कंपन्यांमध्ये प्रत्येक फंडाने किती टक्के गुंतवणूक केली आहे, हेही पाहावे लागते. यासाठी पोर्टफोलिओ ओव्हरलॅप ही पद्धत वापरली जाते.

उदाहरणार्थ, दोन फंडांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक समान कंपन्या असतील आणि त्यांचे एकत्रित ओव्हरलॅप 45 टक्के असेल, तर दोन्ही योजना वेगवेगळ्या असूनही त्यांच्या गुंतवणुकीचा मोठा भाग समान शेअर्समध्ये आहे, असे दिसते.

सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर दर महिन्याला पोर्टफोलिओ ओव्हरलॅपची माहिती जाहीर करणे बंधनकारक केले आहे. गुंतवणूकदार या माहितीच्या मदतीने आपल्या फंडांमधील समान गुंतवणूक तपासू शकतात.

केवळ समान शेअर्स नव्हे, तर या गोष्टीही तपासा

म्युच्युअल फंड निवडताना केवळ कोणत्या कंपन्यांचे शेअर्स आहेत, हे पाहून चालत नाही. त्या फंडाची गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात आहे, कोणत्या आकाराच्या कंपन्यांमध्ये आहे आणि फंड व्यवस्थापकाची गुंतवणुकीची पद्धत काय आहे, हेही तपासणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, दोन फंडांमध्ये वेगवेगळ्या बँकांचे शेअर्स असू शकतात. मात्र, दोन्ही फंडांची मोठी गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात असेल, तर तुमची या क्षेत्रातील गुंतवणूक जास्त प्रमाणात केंद्रित होऊ शकते.

त्याचप्रमाणे, वेगवेगळ्या योजनांमध्ये ग्रोथ किंवा मोमेंटम या पद्धतीने गुंतवणूक केली जात असेल, तर बाजारातील चढ-उतारांचा परिणाम या सर्व फंडांवर जवळपास सारखाच होऊ शकतो. म्हणूनच फंडांमध्ये किती टक्के ओव्हरलॅप असल्यास तो बंद करावा, यासाठी कोणताही एक ठरलेला नियम नाही.

Mutual Fund SIP Portfolio Overlap
Yash Patil AI Startup: वय फक्त 23 वर्षे! AI कंपनी विकून कमावले 40 हजार कोटी; यश पाटीलची जगभर चर्चा

ओव्हरलॅप असलेली SIP बंद करावी का?

तुमच्या दोन किंवा अधिक म्युच्युअल फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात समान शेअर्स असल्याचे लक्षात आले, तर लगेच गुंतवणूक काढून घेण्याची गरज नाही. आधी प्रत्येक फंडाचा उद्देश समजून घ्या.

एखादा फंड मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी घेतला आहे का? दुसरा मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी आहे का? एखादा फंड वेगळ्या गुंतवणूक पद्धतीचा फायदा देतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे.

जर दोन फंड एकाच प्रकारची गुंतवणूक करत असतील, तर त्यापैकी कोणता फंड सुरू ठेवायचा, याचा विचार करता येतो. यासाठी फंडाची दीर्घकालीन कामगिरी, गुंतवणुकीची पद्धत, रिस्क आणि खर्च यांचा विचार करावा.

अनेक फंडांमध्ये थोडी-थोडी गुंतवणूक करण्यापेक्षा कमी संख्येतील चांगले आणि एकमेकांना पूरक असलेले फंड निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे गुंतवणुकीवर लक्ष ठेवणेही सोपे होते.

SIP बंद करणे आणि गुंतवणूक काढणे यात फरक आहे

एखाद्या फंडातील SIP बंद केली म्हणजे त्या फंडात आधीपासून जमा असलेली संपूर्ण रक्कम काढून घेतली, असा अर्थ होत नाही. SIP बंद केल्यानंतरही त्या फंडातील आधी खरेदी केलेले युनिट्स तुमच्याकडे राहतात.

त्यामुळे ओव्हरलॅप दिसल्यास आधी भविष्यातील SIP चे हप्ते थांबवणे किंवा दुसऱ्या फंडाकडे वळवणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र, आधीची गुंतवणूक काढायची की नाही, याचा स्वतंत्रपणे विचार करावा.

कारण म्युच्युअल फंडातील युनिट्स विकल्यास भांडवली नफा कर लागू होऊ शकतो. तसेच काही योजनांमध्ये ठरावीक कालावधीच्या आधी पैसे काढल्यास एक्झिट लोडही द्यावा लागू शकतो. त्यामुळे केवळ ओव्हरलॅप दिसला म्हणून घाईघाईने गुंतवणूक बंद करु नका.

Mutual Fund SIP Portfolio Overlap
Kangana Ranaut on Yogi Adityanath Mother Death: योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींचे निधन; कंगना राणावतची भावनिक पोस्ट चर्चेत

चांगले इक्विटी फंड असूनही रिस्क कायम

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. तुमच्याकडे पाच चांगले आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे इक्विटी फंड असले, तरी संपूर्ण गुंतवणूक शेअर बाजाराशी संबंधित असते. त्यामुळे बाजारातील घसरणीचा परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर होऊ शकतो.

म्हणूनच केवळ इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी गरजेनुसार डेट फंड आणि इतर मालमत्ता प्रकारांमध्येही गुंतवणूक करण्याचा विचार करावा. हे करताना तुमची आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणुकीचा कालावधी आणि रिस्क घेण्याची क्षमता लक्षात घेणे आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे तर, तुमच्याकडे किती SIP आहेत, यापेक्षा त्या SIP मधून कुठे गुंतवणूक होत आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. फंडांची संख्या वाढवण्यापेक्षा योग्य नियोजन करून गुंतवणुकीत खऱ्या अर्थाने विविधता आणणे गरजेचे आहे.

(शिवानी शेळके या ‘राइज अँड शाइन' वेल्थ मॅनेजमेंट कंपनीमध्ये ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत.)

नोंद: गुंतवणूक करताना नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.