Milk Price Hike: महागाईचा झटका! ‘अल निनो’मुळे दूध पुन्हा महागणार? अमूल-मदर डेअरीने दिले मोठे संकेत

Milk Price Hike Alert: अल निनोच्या प्रभावामुळे देशात कमी पावसाची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
Milk Price Hike
Milk Price Hike Pudhari
Published on
Updated on

Milk Price Hike Alert: सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा खर्च आधीच वाढलेला असताना आता आणखी एक बातमी समोर आली आहे. येत्या काही महिन्यांत दूधाच्या किमती पुन्हा वाढू शकतात, अशी शक्यता डेअरी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे ‘अल निनो’. कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे दूधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, अल निनोचा परिणाम देशातील पावसावर होऊ शकतो. पाऊस कमी झाल्यास जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चारा आणि पाण्याची कमतरता वाढल्यास दूध उत्पादनावर थेट परिणाम होतो. परिणामी दूधाचा पुरवठा घटतो आणि किमती वाढण्याचा दबाव निर्माण होतो.

काही आठवड्यांपूर्वीच अमूल, मदर डेअरीसह अनेक डेअरी कंपन्यांनी दूधाच्या किमतीत 2 ते 3 टक्क्यांनी वाढ केली होती. आता जर मान्सून अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर जुलै किंवा ऑगस्टमध्ये दूधाच्या किमतीत आणखी 3 ते 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डेअरी उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे की, कमी पावसाच्या परिस्थितीत शेतकरी अनेकदा जनावरांची संख्या कमी करतात. कारण त्यांच्यासाठी पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध करून देणे कठीण होते. याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो आणि बाजारात दूधाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

महाराष्ट्र शासनानेही या संभाव्य संकटाची दखल घेतली आहे. पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना चारा पिकांच्या नियोजनाबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील पशुपालकांनी आतापासूनच चाऱ्याची साठवण आणि उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Milk Price Hike
Jio IPO: जिओच्या IPO ची मोठी घोषणा! मुकेश अंबानींचा ऐतिहासिक निर्णय; सेबीकडे आजच DRHP दाखल

दरम्यान, अमूल आणि मदर डेअरीसारख्या मोठ्या कंपन्यांनी सध्या घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. अमूलच्या व्यवस्थापनानुसार, मान्सूनची स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच दूधाच्या किमतींबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या तरी चाऱ्याची परिस्थिती चिंताजनक नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मदर डेअरीनेही आपल्या खरेदी क्षेत्रातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले आहे. आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, हवामानातील अनिश्चितता कायम राहिल्यास त्याचा फटका थेट ग्राहकांच्या खिशाला बसू शकतो. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी दूधाच्या किमतीतील संभाव्य वाढ ही आणखी एक डोकेदुखी ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले असून, पावसाची स्थितीच दूधाचे दर स्थिर राहणार की पुन्हा वाढणार, हे ठरवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news