

Success Story
लखनऊ: एक २८ वर्षीय उद्योजकाने स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभारून महिन्याला १.७ ते २ लाख रुपयांची कमाई सुरू असतानाही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक यश असूनही समाजात अपेक्षित सन्मान आणि अधिकार मिळत नसल्याची भावना व्यक्त करत त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर पैसा, प्रतिष्ठा, सत्ता आणि यशाच्या व्याख्यांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील या उद्योजकाने 'r/IndiaBusiness' या रेडिट फोरमवर "माझा व्यवसाय मला दरमहा १.७ ते २ लाख रुपयांचा नफा मिळवून देत आहे, तरीही मी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे," अशा कॅप्शनसह ही पोस्ट शेअर करत त्याने आपले अनुभव मांडले.
त्याने सांगितले की, कायद्याचे शिक्षण घेत असताना त्याने हेल्दी फूड ब्रँडची सुरुवात केली होती. कॉलेजच्या काळात सुरू झालेला हा उपक्रम कालांतराने लखनौमध्ये एक नावाजलेला व्यवसाय बनला. "मी २८ वर्षांचा आहे, चांगले उत्पन्न मिळवत आहे आणि पुढील फेब्रुवारीमध्ये माझे लग्न होणार आहे. मी लखनौमध्ये एक 'हेल्दी फूड ब्रँड' चालवतो, जो गेल्या सात वर्षांत शहरात चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. यातून दरमहा ७ ते ८ लाख रुपयांची उलाढाल होते आणि मला स्वतःला सुमारे १.७ ते २ लाख रुपयांचा नफा मिळतो."
उद्योजक तरूणाने सांगितले की, त्याचे वडील स्वतःही यशस्वी व्यावसायिक आहेत. मात्र, मुलाने व्यवसाय करण्याऐवजी न्यायव्यवस्थेत करिअर करावे, अशी त्यांची इच्छा होती. राष्ट्रीय विधी विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर मुलगा न्यायाधीश बनेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, शिक्षणाच्या काळातच त्याचा व्यवसाय वाढू लागला आणि त्याने कायद्याच्या क्षेत्राऐवजी व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. "तिसऱ्या वर्षानंतर मी कायद्याकडे पुन्हा वळून पाहिले नाही. फक्त पदवी पूर्ण केली आणि व्यवसायातच रमलो," असे त्याने सांगितले.
काही वर्षे व्यवसाय यशस्वीपणे चालवल्यानंतर त्याच्या यशाविषयीच्या कल्पनांमध्ये बदल झाला. चांगली कमाई आणि स्वतःची कंपनी असली तरी समाजात अपेक्षित सन्मान मिळत नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. "अलीकडेपर्यंत मला याची पर्वा नव्हती. पण आता व्यवसायिकांकडे नसलेली सत्ता आणि अधिकार मला जाणवू लागले आहेत. माझे वडील नेहमी म्हणायचे की पैसा सर्वकाही नसतो, व्यक्तीची खरी किंमत त्याच्या पदामुळे ठरते. अनेकदा पोलीसही तुमच्याशी तुच्छतेने वागतात. तो सन्मान मिळत नाही," असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले.
याच जाणिवेतून त्याने उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (UPPSC) परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा त्याचा विचार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. "सुदैवाने माझा व्यवसाय आता पूर्णपणे ऑटोमेटेड झाला आहे. त्यासाठी माझी रोजची उपस्थिती आवश्यक नाही," असे त्याने सांगितले.
सोशल मीडियावर या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला व्यवसाय अधिक मोठा करण्याचा सल्ला दिला, तर काहींनी सरकारी सेवेतून समाजावर होणाऱ्या परिणामाचा विचार करण्यास सांगितले. या चर्चेला उत्तर देताना त्याने आपल्या निर्णयामागील मुख्य कारण सांगितले. "भारतात सन्मान ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ही जाणीव मला अलीकडेच झाली," असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा भारतातील करिअर निवड, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक यश आणि सरकारी नोकरीबाबतच्या मानसिकतेवर चर्चा रंगली आहे.