Stock market | वेळ, शिस्त आणि संयम...

७-५-३-१ नियमाने उभारा भक्कम आर्थिक साम्राज्य
Stock market |
Stock market | वेळ, शिस्त आणि संयम...
Published on
Updated on

विवेक कुलकर्णी

शेअर बाजारात जलद नफा कमावण्याच्या मोहात अनेक गुंतवणूकदार अडकतात; मात्र दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी वेगापेक्षा सातत्य, संयम आणि योग्य नियोजन अधिक महत्त्वाचे ठरते. अशाच विचारावर आधारित '७-५-३-१' नियम गुंतवणुकीला शिस्तबद्ध दिशा देतो. हा नियम केवळ चांगला परतावा मिळवून देत नाही, तर बाजारातील चढ-उतारांमध्येही गुंतवणूकदाराला योग्य निर्णय घेण्यास मदत करतो.

७-५-३-१ नियम म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा नियम प्रभावी मानला जातो. या नियमातील प्रत्येक अंक गुंतवणुकीच्या एका महत्त्वाच्या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. योग्य कालावधी, विविधीकरण, भावनांवर नियंत्रण आणि गुंतवणुकीत सातत्य या चार आधारस्तंभांवर हा नियम उभा आहे.

७ '७' म्हणजे किमान सात वर्षांचा कालावधी

इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा खरा फायदा दीर्घकालीन कालावधीत मिळतो. त्यामुळे किमान सात वर्षे गुंतवणूक कायम ठेवण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात अल्पकालीन घसरण झाली, तरी दीर्घकाळात चांगल्या दर्जाच्या इक्विटी फंडांनी सरासरी १२ ते १५ टक्के वार्षिक परतावा दिल्याची उदाहरणे आहेत.

याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, दरमहा १० हजार रुपयांची एसआयपी सात वर्षे सुरू ठेवली, तर एकूण गुंतवणूक ८.४0 लाख रुपये होते. वार्षिक १२ टक्के परतावा गृहीत धरल्यास निधीचे मूल्य सुमारे १२.८८ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

५ '५' म्हणजे विविधीकरण

संपूर्ण रक्कम एका म्युच्युअल फंडात गुंतवण्याऐवजी ती पाच वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांमध्ये विभागणे अधिक सुरक्षित ठरते. उदाहरणार्थ, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप आणि आंतरराष्ट्रीय फंड. एखाद्या विभागाची कामगिरी कमी झाली, तरी इतर फंड त्याचा परिणाम कमी करू शकतात. त्यामुळे जोखीम नियंत्रित राहते.

३ '३' म्हणजे भावनांवर नियंत्रण

गुंतवणुकीतील सर्वात मोठा शत्रू म्हणजे स्वतःच्या भावना. बाजार तेजीत असताना अति उत्साहाने अधिक गुंतवणूक करणे, घसरण सुरू होताच भीतीपोटी पैसे काढून घेणे किंवा झटपट नफ्याच्या लालसेने वारंवार व्यवहार करणे, या चुका टाळणे आवश्यक आहे. गुंतवणुकीत निर्णय नेहमी नियोजनावर आधारित असावेत, भावनांवर नाही.

१ '१' म्हणजे दरवर्षी गुंतवणुकीत वाढ

महागाई आणि वाढते उत्पन्न लक्षात घेऊन दरवर्षी एसआयपीची रक्कम किमान १० टक्क्यांनी वाढवावी. यामुळे चक्रवाढीचा परिणाम अधिक प्रभावी होतो आणि दीर्घकाळात संपत्ती निर्मितीचा वेग वाढतो.

चक्रवाढीची ताकद कशी काम करते?

एकरकमी एक लाख रुपयांची गुंतवणूक वार्षिक १२ टक्के परताव्याने वाढत गेल्यास चक्रवाढीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो.

६ वर्षांत सुमारे १.९७ लाख रुपये.

१० वर्षांत ३.१० लाख रुपये.

१५ वर्षांत ५.४७ लाख रुपये.

२० वर्षांत ९.६४ लाख रुपये.

२५ वर्षांत १७.०१ लाख रुपये.

३० वर्षांत तब्बल २९.९५ लाख रुपये.

यावरून वेळ हा गुंतवणुकीतील सर्वात मोठा मित्र असल्याचे स्पष्ट होते.

थोडक्यात, शेअर बाजारातून मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. मात्र, '७-५-३-१' नियम अंगीकारल्यास गुंतवणुकीत शिस्त, संयम आणि सातत्य राखणे सोपे होऊ शकते. दीर्घकालीन दृष्टीकोन, योग्य गुंतवणूक विविधीकरण, भावनांवर नियंत्रण आणि दरवर्षी वाढणारी गुंतवणूक या चार सवयी जोपासल्या, तर आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास अधिक भक्कम होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news