

अनेकदा आपला क्रेडिट स्कोअर चांगला असतो. बँकेकडून नियमित व्यवहार केलेले असतात. तरीदेखील वैयक्तिक कर्जासाठीचा (पर्सनल लोन) अर्ज नाकारला जातो. अशा वेळी प्रश्न पडतो की नेमके काय चुकले? प्रत्यक्षात वैयक्तिक कर्जासाठीचा (पर्सनल लोन) अर्ज नाकारताना कर्ज देणारी संस्था फक्त क्रेडिट स्कोअरवर निर्णय घेत नाही, तर इतर अनेक घटकांवरही विचार करते.
कर्ज मंजूर करताना वयाचा महत्त्वपूर्ण विचार केला जातो. तरुण नोकरी करणार्या व्यक्तींना बँका जास्त विश्वासार्ह मानतात. कारण त्यांच्याकडे दीर्घ सेवा कालावधी असतो. परंतु, ज्यांचे वय निवृत्तीच्या जवळ आलेले आहे किंवा जे लवकरच नोकरी सोडणार आहेत, त्यांचे अर्ज बँक अनेकदा नाकारते. कारण कर्जाचा कालावधी संपण्याआधीच त्यांचे उत्पन्न बंद होण्याची शक्यता असते.
स्वयंरोजगार करणारे लोक किंवा फ्रीलान्सर यांचे उत्पन्न निश्चित नसते. बँकेला प्रत्येक महिन्याचे स्थिर उत्पन्न दिसणे गरजेचे असते. जर उत्पन्न अधूनमधून येत असेल किंवा व्यवसायात स्थैर्य नसेल, तर बँक कर्ज देताना संकोच करते. त्यामुळे अशा अर्जांची नकारात्मक तपासणी होते.
जर एखाद्या व्यक्तीवर आधीच मोठ्या रकमेचे कर्ज बाकी असेल आणि त्याच्या मासिक उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक भाग त्या कर्जाच्या हप्त्यात जात असेल, तर नवीन कर्ज मंजूर होण्याची शक्यता कमी होते. विद्यमान जबाबदार्या पूर्ण करून अर्जदाराला नवीन कर्जाचे हप्ते परवडतील का, हे बँक पडताळून पाहते.
कधी कधी व्यक्ती स्वतःच्या गरजेनुसार कर्जमागणी केली जाते; पण क्रेडिट स्कोअर उत्कृष्ट असला, तरी पगाराच्या तुलनेत कर्जाची मागणी खूप मोठी असेल तर बँक तो अर्ज नाकारते. कारण परतफेडीची क्षमता (रिपेमेंट कॅपॅसिटी) कमी असल्यास धोका वाढतो.
ज्यांची नोकरी करारावर आधारित आहे, तो करार काही महिन्यांत किंवा एका वर्षात संपणार असेल तर अशा लोकांचे अर्जही बँका नाकारतात. कारण कर्जाचा कालावधी दीर्घ असतो व नोकरी संपल्यावर उत्पन्न थांबण्याची शक्यता असते.
त्यामुळे वैयक्तिक कर्ज अर्ज करण्यापूर्वी या सर्व घटकांचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. असे केल्यास अर्ज नाकारला जाण्याची शक्यता कमी होते आणि आर्थिक नियोजन अधिक सुरक्षित बनते.
कर्ज अर्ज करताना बँक तुमच्या संपूर्ण आर्थिक इतिहासाचा (फायनान्शियल बॅकग्राऊंड) अभ्यास करते. वेळोवेळी कर्जाची परतफेड केली नसेल, किंवा पूर्वीचे हप्ते थकलेले असतील, तर तुमच्यावरील विश्वास कमी होतो. कर्जासाठी अर्ज वारंवार केल्यास क्रेडिट प्रोफाईल कमजोर दिसते.
त्यामुळे केवळ चांगला क्रेडिट स्कोअर पुरेसा नसतो. बँकेला तुमच्या उत्पन्नाची नियमितता, आर्थिक जबाबदार्या, वय, नोकरीतील स्थैर्य आणि परतफेडीची क्षमता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.