ITR Form | सुधारित आयटीआर फॉर्ममध्ये समाविष्ट केलेले प्रमुख बदल

ITR Form |
ITR Form | सुधारित आयटीआर फॉर्ममध्ये समाविष्ट केलेले प्रमुख बदल
Published on
Updated on

सीए सतीश डकरे

यावर्षी आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये बदल करण्यात आले असून, आयटीआर-3 आणि आयटीआर-4 साठीची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, पॅनकार्ड अहवाल देण्याच्या नवीन मर्यादा, कर बचतीसाठीच्या भत्त्यांच्या सुधारित मर्यादा, आणि शेअर बायबॅकवरील कर आकारणी इ.च्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

अनुमानित कर योजना निवडणार्‍या करदात्यांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती देणे आवश्यक - (आयटीआर 4)

अनुमानित कर योजनेची निवड करणार्‍या करदात्यांना आता त्यांच्या वर्षाअखेरच्या गुंतवणुकीची माहिती आयकर विवरणपत्रात (आयटीआर) देणे बंधनकारक आहे. आर्थिक पारदर्शकता वाढवण्यासाठी लागू करण्यात आलेली ही अनुपालन आवश्यकता, आयकर विभागाला घोषित केलेल्या ’अनुमानित’ उत्पन्नाची, मालमत्ता निर्मिती आणि खर्चाच्या पद्धतींशी पडताळणी करण्यास मदत करते.

सुधारित आयटीआर-4 (सुगम) फॉर्ममध्ये, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) व्यवसायाचा आर्थिक तपशील या विभागांतर्गत एक स्वतंत्र रकाना समाविष्ट केला आहे. करदात्यांना खालील गोष्टी करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीची घोषणा करणे : करदात्याने संबंधित आर्थिक वर्षाच्या 31 मार्चपर्यंत गुंतवणुकीची रक्कम आणि तपशील उघड करणे.

धर्मादाय विश्वस्त संस्थेने केलेल्या गुंतवणुकीच्या ‘नाममात्र मूल्या’ऐवजी ‘एकूण मूल्य’ नोंदवले जाईल. - (आयटीआर 7)

फॉर्म आयटीआर-7 मधील (अनुसूची जे - मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशीचा निधी आणि गुंतवणूक दर्शवणारे विवरण) मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी धारण केलेल्या निधी आणि गुंतवणुकीचे विवरण आवश्यक आहे, आणि हे कलम 11 आणि 12 किंवा कलम 10 (23सी) (iv), र्(v), (vi) किंवा (via) अंतर्गत सूट मागणार्‍या करदात्यांना लागू आहे.

या अनुसूचीमध्ये, ज्या संस्थांमध्ये कलम 13(3) किंवा कलम 10(23सी) च्या 21 व्या तरतुदीमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींचे महत्त्वपूर्ण हितसंबंध आहेत, अशा संस्थांमध्ये मागील वर्षात केलेल्या गुंतवणुकीच्या संदर्भात विशिष्ट खुलासा करणे आवश्यक आहे. सादर करावयाच्या तपशिलांमध्ये संस्थेचे नाव आणि पत्ता, तिचे स्वरूप, भागधारणेचा तपशील, अशा गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न आणि गुंतवणूक संस्थेच्या भांडवलाच्या पाच टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे की नाही, याचा समावेश आहे.

मूल्यांकन वर्ष 2026-27 साठीच्या फॉर्म आयटीआर-7 मध्ये, ‘गुंतवणुकीचे नाममात्र मूल्य’ या शब्दाऐवजी ‘गुंतवणुकीचे एकूण मूल्य’ हा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. ‘नाममात्र मूल्य’ म्हणजे सामान्यतः शेअर्स किंवा सिक्युरिटीजचे दर्शनी मूल्य असले, तरी ‘एकूण मूल्य’ ही संज्ञा अधिक व्यापक असून, ती केवळ दर्शनी मूल्याऐवजी गुंतवणुकीच्या प्रत्यक्ष मूल्याचा समावेश करते.

जर ट्रस्ट किंवा संस्थेचा कोणताही निधी, मागील वर्षातील कोणत्याही कालावधीसाठी, अशा कोणत्याही व्यवसायात गुंतवलेला असेल किंवा गुंतवलेला राहिला असेल, ज्यामध्ये त्या हितसंबंधी व्यक्तीचे मोठे हितसंबंध आहेत, तर त्या हितसंबंधी व्यक्तीला लाभ झाला आहे असे मानले जाते. तथापि, जर एखाद्या व्यवसायात गुंतवलेल्या निधीची एकूण रक्कम, ज्यामध्ये कोणत्याही हितसंबंधी व्यक्तीचे मोठे हितसंबंध आहेत, त्या व्यवसायाच्या भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त नसेल, तर कलम 11 अंतर्गत सूट केवळ अशा गुंतवणुकीतून ट्रस्टला मिळणार्‍या उत्पन्नावरच नाकारली जाईल. दुसर्‍या शब्दांत, अशा परिस्थितीत, उक्त गुंतवणुकीतून मिळणार्‍या उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्नासाठी कलम 11 अंतर्गत सूट नाकारली जाणार नाही.

कलम 13(2)(ह) च्या संदर्भात पाहिल्यास, गुंतवणूक संस्थेच्या भांडवलाच्या पाच टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे की नाही हे आता गुंतवणुकीच्या एकूण मूल्याच्या संदर्भात तपासले जाईल, ज्यामुळे ज्या संस्थांमध्ये निर्दिष्ट व्यक्तींचे महत्त्वपूर्ण हितसंबंध आहेत अशा संस्थांमधील गुंतवणुकीच्या प्रकरणांमध्ये छाननीची व्याप्ती संभाव्यतः वाढेल.

इतर कायद्यांनुसार प्राप्त नोंदणीच्या वैधतेच्या कालावधीचा अहवाल देणे आवश्यक (आयटीआर 7)

भाग अ - सामान्य मध्ये करदात्याची मूलभूत आणि नियामक माहिती समाविष्ट असते. या तक्त्यामधील कलम ए20 नुसार आयकर कायद्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कायद्यानुसार प्राप्त केलेली नोंदणी/तात्पुरती नोंदणी/मंजुरी उघड करणे आवश्यक आहे. यामध्ये :

• परकीय योगदान (नियमन) अधिनियम, 2010 अंतर्गत नोंदणी

• दर्पण पोर्टलवर नोंदणी

• भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाकडे नोंदणी

• इतर कोणताही लागू कायदा किंवा नियामक चौकट

फॉर्ममध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे :

(अ) ज्या कायद्या/पोर्टल अंतर्गत नोंदणी केली आहे त्याचे नाव

(ब) इतर कोणताही कायदा असल्यास तपशील

(क) नोंदणी किंवा मंजुरीची तारीख

(ड) मंजुरी/अधिसूचना/नोंदणी क्रमांक

(इ) मंजुरी देणारे/नोंदणी करणारे प्राधिकरण

(फ) ज्या तारखेपासून नोंदणी प्रभावी आहे ती तारीख (क्रमश:)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news