

iPhone Price Increase in India: भारतात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Apple च्या iPhone ची किंमत आता वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही वाढ फक्त नवीन मॉडेल्सपुरती मर्यादित नसून, जुन्या मॉडेल्सवरही त्याचा परिणाम होणार आहे.
सध्या अनेक ग्राहक नवीन iPhone लॉन्च झाल्यानंतर एक-दोन वर्षे जुने झालेले मॉडेल कमी किमतीत खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र आता iPhone 16, iPhone 15 आणि iPhone 14 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत सुमारे 5,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
या किंमत वाढीमागचं मुख्य कारण म्हणजे Apple ने रिटेलर्सना दिला जाणारा “डिमांड जनरेशन सपोर्ट” (DG Support) अचानक मागे घेतला आहे. हा सपोर्ट रिटेलर्सना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि सवलती देण्यासाठी वापरला जात होता. त्यामुळे iPhone वर चांगलं डिस्काउंट मिळत होतं. आता हा सपोर्ट बंद झाल्यामुळे रिटेलर्स सवलत देणार नाहीत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे iPhone ची अधिकृत MRP (कमाल किरकोळ किंमत) बदललेली नाही. पण “डिमांड जनरेशन सपोर्ट” बंद झाल्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट्स जवळपास बंद होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता 3,000 ते 5,000 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
फक्त Appleचं नव्हे तर संपूर्ण स्मार्टफोन बाजारातच किंमती वाढण्याचा ट्रेंड सुरू आहे. Samsung, Oppo, Vivo आणि Xiaomi यांसारख्या प्रमुख अँड्रॉइड ब्रँड्सनीही नोव्हेंबरपासून आपल्या फोनच्या किंमती वाढवायला सुरुवात केली आहे.
या वाढीमागचं मुख्य कारण म्हणजे मोबाईल पार्ट्स, विशेषतः मेमरी आणि स्टोरेजच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ. उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्या आता विक्रीपेक्षा नफा टिकवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. इतकंच नाही तर काही कंपन्यांनी उत्पादन लक्ष्य (production target) 20 टक्क्यांपर्यंत कमी केल्याचीही माहिती समोर आली आहे.
तरीही, iPhone विक्रीवर या वाढीचा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. कारण भारतात मोठ्या प्रमाणावर iPhone EMI वर विकले जातात. त्यामुळे किंमत वाढली तरी ती ग्राहकांना हप्त्यांमध्ये विभागून द्यावी लागते, त्यामुळे मागणीवर फारसा परिणाम होत नाही.
मात्र, अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटवर याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, यामुळे अँड्रॉइड फोनची विक्री कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, भारतीय स्मार्टफोन बाजारात आता iPhone असो किंवा अँड्रॉइड फोन... ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार, हे जवळपास निश्चित आहे.