Ferrari EV: iPhone सारखं केबिन... अन् हेलिकॉप्टरसारखी स्टार्टिंग! कशी आहे फेरारीची पहिली इलेक्ट्रिक कार?

पुढारी वृत्तसेवा

जगभरात आपल्या शक्तिशाली स्पोर्ट्स कारसाठी प्रसिद्ध असलेली इटालियन कंपनी फेरारी आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

फेरारीने आपल्या या पहिल्या ईव्हीच्या नावाचा खुलासा केला असून, तिचे नाव 'Ferrari Luce' असे ठेवण्यात आले आहे.

डिझाइनमध्ये Apple ची झलक

कंपनीने या कारच्या इंटेरियरची पहिली झलक दाखवून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. या कारची केबिन अत्यंत युनिक आणि स्टायलिश आहे.

Ferrari Luce चे इंटेरियर आणि एक्सटेरियर 'Love From' या डिझाइन फर्मने तयार केले आहे. या फर्मचे सह-संस्थापक ॲपलचे माजी डिझाइन चीफ जॉनी आइव आहेत. त्यामुळेच कारच्या केबिनमध्ये आयफोनसारखे क्लीन आणि प्रीमियम डिझाइन पाहायला मिळते.

स्टीयरिंग व्हील: याचे थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील १९५० आणि ६० च्या दशकातील फेरारी कारपासून प्रेरित आहे.

फिजिकल बटन्स: इंडिकेटर, वायपर, क्रूझ कंट्रोल आणि ड्रायव्हिंग मोडसाठी फिजिकल बटणे देण्यात आली आहेत. तसेच लाल रंगातील प्रसिद्ध 'मानेत्तीनो' स्विच देखील आहे.

आजच्या काळात टचस्क्रीन महत्त्वाची असली, तरी फेरारीने पूर्ण डॅशबोर्ड स्क्रीनने भरलेला नाही. येथे १० इंचाची टॅबलेटसारखी स्क्रीन देण्यात आली आहे.

टचस्क्रीनच्या खाली मीडिया आणि क्लायमेट कंट्रोलसाठी स्विचेस, तर वर एक खास घड्याळ आहे.

मॅजिकल चावी

कार सुरू करण्यासाठी चावी एका विशिष्ट जागी दाबून बसवावी लागते. चावी 'क्लिक' होताच कार स्टार्ट होते.

लॉन्च कंट्रोल

हे सर्वात खास फीचर आहे. हेलिकॉप्टरप्रमाणे ड्रायव्हरच्या डोक्यावर असलेली ग्रिप ओढून लॉन्च कंट्रोल सिस्टम ॲक्टिव्ह केली जाते.