शेअर्स गुंतवणूकदारांना गुंतवणूकभान हवेच !

शेअर्स गुंतवणूकदारांना गुंतवणूकभान हवेच !

[author title="प्रा. डॉ. विजय ककडे" image="http://"][/author]

इंटरनेटच्या माध्यमातून बर्‍याचदा अपुरी, चुकीची भ्रामक माहिती वगाने पसरते. वेळेचा व त्यापेक्षा संतुलित विचारांचा आभाव असल्याने विनाखात्री करता अशी माहिती महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी वापरली जाते. यालाच ईडियट म्हणजे संगणक आधारित अवरोधक उपचार (IDIOT) असे म्हणतात. अशा माहितीच्या आधारावरील व्यवहारातील आजारग्रस्त 10 पैकी 9 वित्तीय द़ृष्टीने नाश पावतात.

भारतीय शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टी नवनवे उच्चांक स्थापन करीत असून शेअर्स गुंतवणूकदारांना एक दिवसात काही लाख कोटींचे अधिक्य मिळाले. शेअर बाजाराची जागतिक क्रमवारी पाहिली, तर भारतीय बाजाराचा आकार चौथ्या क्रमांकावर येईल, असे आशावादी चित्र दिसते. शेअर्स बाजाराचे दीर्घकालीन म्हणजे 15 ते 20 वर्षांत निफ्टी 1,50,000 पर्यंत जाण्याचे अंदाज व्यक्त होतात. गुंतवणुकीचा हॉट स्पॉट म्हणून भारताकडे विश्वसनीय ठिकाण म्हणून जसे एक चमकदार बाजू दिसते त्याचप्रमाणे याच नाण्याची प्रकाशित, कृष्ण बाजू गुंतवणुकीच्या नुकसानकारक निर्णय प्रक्रियेची असून याचे वर्णन 'ईडियट गुंतवणूकदार' असेही केले जाते. ही गुंतवणूक महामारी इन्फोडेमिक स्वरूपाची असून आपण अथवा आपले मित्र नातेवाईक या छुप्या परंतु वेगाने वाढणार्‍या संसर्गजन्य किंवा संपर्कजन्य आजारात नाही याची खात्री करणे आता आवश्यक आहे. कारण, अशा व्यवहारातील आजारग्रस्त 10 पैकी 9 वित्तीय द़ृष्टीने मरण पावतात व त्यामुळेच सातत्याने सेबीमार्फत सावधानतेची सूचना दिली जाते. गुंतवणुकीतील हा 'ईडियट' आजार, स्वरूप व उपाय थोडे सविस्तर पाहू.

'ईडियट गुंतवणूकदार'

इंटरनेटच्या साह्याने माहिती वेगाने सार्वत्रिक व स्वस्त (मोफत) पसरत असून आता गुगलने ज्ञान वाढवणे सोपे झाले आहे; पण यातूनच अपुरी, चुकीची, भ्रामक माहिती वेगाने पसरते. वेळेचा व त्याहीपेक्षा संतुलित विचारांचा अभाव असल्याने विनाखात्री करता अशी माहिती महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वापरली जाते. यालाच ईडियट म्हणजे इंटरनेट आधारित अवरोधक उपचार – "(Internet Derived Information obstructive Treatment IDIOT)" किंवा निर्णय प्रणाली स्वीकारणे असे म्हणतात. याचा वापर आरोग्यासाठी केल्या जाणार्‍या उपायासाठी सर्वाधिक होताना दिसतो. आपल्या आजाराची लक्षणे व त्यावर असणार्‍या 'रामबाण' उपायावर विश्वास ठेवून उपचार सुरू करणारे अंधभक्त खरे तर आजार वाढवून घेतात व नुकसान करून घेतात. पेरूची पाने खाल्याने साखर कमी होते, हे वाचून तत्काळ स्वीकार व वापर करणारे दिसतात. अशी माहिती आधारित उपचार पद्धती ही कोरोनाच्या महामारीपेक्षा मारक असून जागतिक आरोग्य संघटनेने याला 'इन्फोडेमिक' म्हटले आहे; पण आरोग्य क्षेत्रातच नव्हे तर गुंतवणूक क्षेत्रात या आजाराने मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढवला असून नवतंत्रतज्ज्ञ तरुण यामध्ये सर्वाधिक आहेत.

थोडीशी इंटरनेटवरील माहिती व यूट्यूबवरील दोनचार व्हिडीओ पाहून अल्पावधीत मोठ्या फायद्याच्या अपेक्षेने येणार्‍यांना स्वयंघोषित बाजारतज्ज्ञ व वित्तप्रभावक (Finfluencer) यांची युती 'वित्तवेडे' (Financial Idiots) वाढवतात. यांना 'फिडियट' म्हणता येईल. रोजगाराच्या घटत्या संधी, रिकामा वेळ आणि अल्पखर्चात उपलब्ध असणारी इंटरनेट सुविधा व त्यासोबत स्मार्ट फोन हे सर्व वित्तवेडे मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. काही चाणाक्ष संस्था व व्यक्ती तत्काळ व हमखास टीप देऊ, अशी प्रसिद्धी करत अतिलोभासाठी प्रेरित झालेल्यांना आपल्या जाळ्यात घेतात. यांच्याकडे खोटी माहिती देणारे स्क्रीनशॉट आणि सतत संपर्क करणारे नोकर यातून ब्रेनवॉश केला जातो व अल्पावधीत नुकसान व कर्जबाजारीपणा येतो. त्यावरही पुन्हा खरेदीचे सल्ले देऊन अ‍ॅवरेज करण्यास प्रोत्साहन देऊन खोल खड्ड्यात नेतात. हे सर्व डे ट्रेडिंग, ऑप्शन (वायदे बाजार), फॉरेक्स (विदेशी चलन व्यवहार), क्रिप्टो (कूरचलन) अशा विविध तंत्रातून होते.

श्रद्धा व संयम हा संदेश गुंतवणूक क्षेत्रात किंवा अत्यंत महत्त्वाचा असून शेअर बाजारात उत्तम परतावा फक्त दीर्घकाळातच मिळतो, हे सार्वकालिक सत्य विसरता कामा नये. गुंतवणूक उत्तम साधन हे अतिलोभात अडकलेल्या वित्तवेड्यांच्या वर्तनाने बदनाम होत असून याबाबत सावधानता हाच उपाय आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, विश्लेषण करून वित्त सल्ला देणारी नोंदणीकृत संस्था अथवा व्यक्ती यांनीच या क्षेत्रात असावे असा सेबीचा दंडक असूनही ते अल्पकाळाच्या नफ्यासाठी पूर्ण भांडवल घालवतात. त्यांना धोक्याचा इशारा दिसत नाही. वित्तीय गुंतवणूक संधी विस्तारत असताना वित्तवेडेपण टाळणे हे गुंतवणूक शहाणपणाचे पहिले महत्त्वाचे कर्तव्य ठरते.

सेबीचे जोखीम प्रकटन व सूचना

गुंतवणूकदारांना अशा आजारापासून किंवा नुकसानीपासून संरक्षित करण्यासाठी आता सर्व ब्रोकर्स व मध्यस्थ संस्थांना जोखीम प्रकटन व सूचना प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अशा व्यवहारात 10 पैकी फक्त 1 व्यक्ती फायदा मिळवते व 9 व्यक्ती नुकसान पत्करतात, हे ठळकपणे प्रसिद्ध केले असून सरासरी 50 हजारांचे नुकसान यात झाले असल्याचे अभ्यासातून दिसते. वायदा बाजारात कर आणि इतर आकार यासाठी त्यांच्या 100 रुपयांपैकी 28 रुपये व्यवहार खर्चास द्यावे लागतात व त्यामुळे फायद्याचे खरे प्रमाण खूपच कमी राहते. एकूण नफा 15 ते 50 टक्क्यांनी घटतो. सेबीने सर्वसाधारण गुंतवणूकदार अशा सूचना व प्रकरण समजून वित्तवेडा होणार नाही, याची खबरदारी घेतलेली दिसते.

सावधानता हवीच

इंटरनेट आणि स्मार्ट फोन यांच्या वापरातून अर्थिक व्यवहारांना गती मिळाली असून त्यातून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. अल्प काळात भरपूर परतावा मिळवण्यासाठी दिशाभूल करणारी तंत्रे विकसित झाली आहेत. हे सर्व धोके टाळण्यासाठी सावधानता हवी. महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय आपणच घेत असल्याने आपल्या नुकसानीस इतरांपेक्षा आपणच जबाबदार राहतो. मिळालेल्या माहितीचा, तंत्राचा अपुर्‍या किंवा फसव्या वापरास प्रतिबंध घालण्याचा सेबी प्रयत्न करत असली, तरी शेवटी निर्णय आपलाच असतो. वित्तीय बाजारपेठेत व विशेषत: शेअर्स बाजारात डीमॅटधारकांची संख्या गेल्या 5 वर्षांत 1 कोटीवरून 5 कोटी अशी वाढली असून तरुण गुंतवणूक करार व नवतंत्र वापरकर्ते वाढत आहेत. अतिवेगवान लाभाची प्रेरणा जेव्हा नव्या तंत्राच्या वापरातून साध्य करण्याचा प्रयत्न करते त्यातून ईडियट किंवा वित्तवेडे तयार होतात. याचे महत्त्वाचे कारण वित्त साक्षरता व त्यातून येणारी वित्त सावधता याकडे होणारे दुर्लक्ष आहे. फुकट मिळणारी, खात्रीशीर नफा देणारी टीप किंवा गुंतवणूक सल्ला हा प्रचंड नुकसानीचा मार्ग असून वायदे बाजारात वॉरेन बफे यांनी वित्त विनाशाचे महाअस्त्र (weapon of mass distruction of wealth) असे म्हटले आहे. त्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news