

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक स्तरावर स्थिर वाढ असूनही २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian economy) गती थोडी कमकुवत राहण्याची शक्यता आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिया यांनी म्हटले आहे.
जॉर्जिवा म्हणाल्या की, यावर्षी जगात, प्रामुख्याने अमेरिकेच्या व्यापार धोरणाबाबत अनिश्चितता अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी वार्षिक मीडिया राउंडटेबल परिषदेत बोलताना सांगितले की, २०२५ मध्ये जागतिक वाढ स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. पण यात प्रादेशिक तफावत असेल.
"अमेरिका अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी करत आहे. युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदावली आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग थोडीसा कमकुवत आहे," असे जॉर्जिवा यांनी कोणत्याही गोष्टीची अधिक पुष्टी न करता म्हटले आहे.
"कमी उत्पन्न असलेले देश, त्यांच्या सर्व उपायानंतरही अशा एका पातळीवर आहेत; जिथे कोणत्याही नवीन धक्क्याचा त्यांच्यावर लक्षणीय नकारात्मक परिणाम होऊ शकतो," असे जॉर्जिवा यांनी म्हटले असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
"२०२५ मध्ये अनिश्चितता राहू शकते. विशेषतः आर्थिक धोरणांच्या बाबतीत असे चित्र दिसून येईल. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आकार आणि त्यांची भूमिका पाहता, येणाऱ्या प्रशासनाच्या धोरणात्मक दिशानिर्देशांबाबत जागतिक स्तरावर कमालीची उत्सुकता असणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ज्यात विशेषतः शुल्क, कर, नियंत्रण हटवणे आणि सरकारी कार्यक्षमता हे मुद्दे महत्त्वाचे असतील," असेही त्या पुढे म्हणाल्या.