

Income Tax Refund Delay: इन्कम टॅक्स रिफंडची वाट पाहणाऱ्या अनेक करदात्यांमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत अनेकांना आयकर विभागाकडून ई-मेल किंवा एसएमएस मिळाले असून, त्यात त्यांच्या रिटर्नची प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. रिफंडच्या दाव्यात काही “मिसमॅच” किंवा तफावत आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
करदात्यांना पाठवण्यात येणाऱ्या मेसेजनुसार, त्यांचा आयकर रिटर्न (ITR) विभागाच्या “रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस” अंतर्गत निवडण्यात आला आहे. त्यामुळे रिटर्नची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. या मेसेजमध्ये “तपशील ई-मेलद्वारे पाठवला आहे” असंही नमूद केलं जातं.
मात्र अनेक करदात्यांचं म्हणणं आहे की, एसएमएस किंवा मेसेज मिळाल्यानंतरही त्यांच्या ई-मेलवर कोणताही तपशील आलेला नाही. काही प्रकरणांमध्ये तर आयकर पोर्टलवर रिफंड जमा झाल्याचं स्टेटस दिसत असतानाही “रिटर्न होल्डवर आहे” असा मेसेज आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. एका करदात्याने सांगितलं की, “रिटर्न होल्डवर असल्याचा मेसेज आला, पण पोर्टलवर रिफंड जमा झाल्याचं दिसत आहे पण ई-मेलही आलेला नाही. पुढे काय करायचं, हेच कळत नाही.”
चार्टर्ड अकाउंटंट प्रतीक भारदा यांनी सोशल मीडियावर यामागील कारणं स्पष्ट केली आहेत. त्यांच्या मते, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर असे मेसेज पाठवले जात आहेत. विशेषतः ज्या करदात्यांचा रिफंड मोठा आहे किंवा ज्यांच्या 80C, 80D, HRA सारख्या सवलतींचे दावे फॉर्म 16 मधील माहितीसोबत जुळत नाहीत, अशा करदात्यांना मेसेज आले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, या बल्क मेसेजेसबाबत आयकर विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टीकरणात्मक देण्यात आलेले नाही. त्यामुळे करदात्यांचा गोंधळ आणखी वाढला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी आयकर पोर्टलवरील ITR स्टेटस, ई-मेल आणि वर्कलिस्ट काळजीपूर्वक तपासावी. काही त्रुटी आढळल्यास वेळेत सुधारित रिटर्न दाखल करावा. शंका असल्यास कर सल्लागारांचा सल्ला घ्यावा.