

ICICI Bank Minimum Balance
खासगी क्षेत्रातील मोठी बँक आयसीआयसीआय बँकेने बुधवारी मेट्रो आणि शहरी ठिकाणी नवीन बचत खात्यावरील किमान ५० हजार रुपये रकमेची अट मागे घेतली. या बँकेने आता किमान रकमेची मर्यादा (MAB) मेट्रो आणि शहरी ठिकाणी १५ हजार रुपये केली आहे. तर निम-शहरी ठिकाणी ७,५०० रुपये आणि ग्रामीण भागांसाठी २,५०० रुपये ठेवली आहे.
आयसीआयसीआय बँक खातेदारांना त्यांच्या बचत खात्यावर महिन्याला किमान १० हजार रुपये बॅलेन्स ठेवणे बंधनकारक होते. पण १ ऑगस्टपासून मेट्रो आणि शहरी ठिकाणी ही मर्यादा वाढवून ५० हजार रुपये केली होती. पण त्याला जोरदार विरोध झाल्याने बँकेने यू- टर्न घेतला आहे.
बँकेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही १ ऑगस्ट २०२५ पासून उघडलेल्या नवीन बचत खात्यांसाठी मासिक सरासरी किमान रकमेबाबत (MAB) नवीन अट लागू केली होती. पण आमच्या ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायानंतर, आम्ही त्यात सुधारणा केल्या आहेत."
गेल्या आठवड्यात बँकेने केलेल्या घोषणेनुसार, मेट्रो आणि शहरी ठिकाणी नवीन बचत खात्यांसाठी किमान रकमेची मर्यादा १० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये, निम-शहरी ठिकाणी ५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये आणि ग्रामीण भागांसाठी २ हजार रुपयांवरून १० हजार रुपये केली होती.
बँकेच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “बँकेच्या ATM मधील (रोख रक्कम काढण्यासाठी) ५ व्यवहारांनंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारण्यात येईल. सर्व नॉन-फायनान्सियल व्यवहार मोफत राहतील. यात आर्थिक व्यवहारात रोख रक्कम काढणे, बॅलेन्सची चौकशी, मिनी स्टेटमेंट आणि पिन बदल या गोष्टींचा समावेश आहे.
आयसीआयसीआय बँकेचे एटीएम नसलेल्यांसाठी शुल्काची माहिती देताना बँकेने पुढे नमूद केले आहे की, मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूर आणि हैदराबाद या ६ मेट्रो ठिकाणी पहिले तीन व्यवहार मोफत राहतील. त्यानंतरच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी २३ रुपये आणि प्रत्येक आर्थिक नसलेल्या व्यवहारासाठी (non-financial transaction) ८.५ रुपये शुल्क आकारले जातील.