

विवेक कुलकर्णी
मालमत्तेवरील भांडवली नफा कर म्हणजे काय?
मालमत्तेवरील भांडवली नफा कर हा एखादी मालमत्ता विकून झालेल्या नफ्यावर लादलेला कर आहे. जेव्हा तुम्ही एखादी मालमत्ता तिच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीला विकता, तेव्हा विक्री किंमत आणि खरेदीची किंमत यांच्यातील फरक हा भांडवली नफा मानला जातो. या नफ्यावर, भारतात प्रचलित असलेल्या कर कायद्यानुसार, कर आकारला जातो. भांडवली नफ्याचे अल्प मुदत व दीर्घ मुदत असे दोन प्रकार असून, मालमत्ता धारण करण्याची मुदत किती आहे, यावरून तो नफा अल्प मुदतीचा की दीर्घ मुदतीचा, हे ठरते. अल्प मुदतीचा भांडवली नफा असल्यास त्यावर 20 टक्के दराने कर लागतो आणि दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असेल तर त्यावर मालमत्ता विक्रीवरील निर्देशांकाच्या लाभासह 20% किंवा निर्देशांकाच्या लाभाशिवाय 12.5% असा सरळ दर लागू होतो.
नफा कर वाचवण्याच्या रणनीती
संयुक्त मालकी : जर आपण इतरांसोबत संयुक्तपणे मालमत्ता धारण केली असेल, तर विक्रीतून मिळालेला भांडवली नफा सह-मालकांच्या मालकीच्या हिश्श्यानुसार त्यांच्यात विभागला जाऊ शकतो. यामुळे प्रत्येक सह-मालकाला त्याची मूलभूत कर सूट मर्यादा वापरण्याची संधी मिळते आणि एकूण कर दायित्व कमी होण्यास मदत होते. कर बचतीसाठी आणि त्यांचे एकूण कर दायित्व कमी करण्यासाठी, ते त्यांच्या संबंधित नफ्यावर प्रत्येकी 1.25 लाख, म्हणजेच एकूण 2.5 लाखांपर्यंत कर सवलतीचा दावा करू शकतात.
विक्री खर्च कमी करणे : मालमत्ता विक्रीवरील भांडवली नफा मोजताना, नूतनीकरण खर्च यांसारखे काही विक्री खर्च विक्री किमतीतून वजा केले जाऊ शकतात. यामुळे करपात्र भांडवली नफा कमी होतो.
धारण कालावधी : मालमत्ता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ धारण केल्यास, आपण दीर्घ-मुदतीच्या भांडवली नफा कर दरांसाठी पात्र ठरू शकता, जे सामान्यतः अल्प-मुदतीच्या दरांपेक्षा कमी असतात.
निर्देशांकाच्या लाभाचा फायदा घेणे : जेव्हा आपण निवासी मालमत्ता किमान दोन वर्षे धारण केल्यानंतर विकता, तेव्हा तुम्ही निर्देशांकाच्या लाभाचा फायदा घेऊ शकता. निर्देशांक महागाईचा विचार करून मालमत्तेच्या खरेदी किमतीत सुधारणा करतो, ज्यामुळे भांडवली नफ्याची रक्कम आणि परिणामी त्यावरचा कर प्रभावीपणे कमी होतो.
नवीन निवासी मालमत्ता खरेदी करणे (कलम 54 एफ अंतर्गत सूट) : निवासी मालमत्ता विकण्याव्यतिरिक्त, जर तुम्ही इतर कोणतीही मालमत्ता विकली आणि त्या रकमेचा वापर नवीन निवासी मालमत्ता घेण्यासाठी केला, तर तुम्ही कलम 54 एफ अंतर्गत कर सवलतीचा दावा करू शकता. वर नमूद केलेल्या अटींप्रमाणेच, नवीन निवासी मालमत्ता विकण्यापूर्वी एक वर्ष आधी किंवा विकल्यानंतर दोन वर्षांच्या आत खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच, ती मालमत्ता विकल्यानंतर तीन वर्षांच्या आत बांधली गेली पाहिजे. ही कर सवलत घेताना, विक्रेत्याकडे नव्याने अधिग्रहित केलेल्या मालमत्तेव्यतिरिक्तएकापेक्षा जास्त निवासी मालमत्ता नसावी, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.tax
कर तोटा भरणे : म्युच्युअल फंड किंवा समभागांच्या विक्रीतून झालेल्या तोट्याचा उपयोग मालमत्ता विक्रीवरील भांडवली नफा समायोजित करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे तुमचे कर दायित्व कमी होते.
बॉण्डस्मध्ये गुंतवणूक करणे (कलम 54 ईसी अंतर्गत सूट) : कलम 54 ईसी अंतर्गत, तुम्ही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा ग्रामीण विद्युतीकरण महामंडळद्वारे जारी केलेल्या निर्दिष्ट रोख्यांमध्ये गुंतवणूक करून मालमत्ता विक्रीवरील भांडवली नफा कर वाचवू शकता. ही गुंतवणूक विक्रीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत करणे आवश्यक आहे.
54 जीबी अंतर्गत, व्यक्तींना त्यांच्या निवासी मालमत्ता विक्रीतून मिळालेला दीर्घ-मुदतीचा भांडवली नफा उत्पादन गतिविधींमध्ये गुंतलेल्या पात्र कंपनीच्या समभागांमध्ये पुनर्गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
भांडवली नफा खाते योजनेत गुंतवणूक (सीजीएस) : सवलत मिळवण्यासाठी भांडवली नफा खाते योजनेत (सीजीएस) गुंतवणूक करण्याचा विचार करा. तथापि, सीजीएसमध्ये जमा केलेली रक्कम तीन वर्षांच्या आत वापरली जाणे आवश्यक आहे, अन्यथा त्या रकमेवर कर भरावा लागेल.