Income tax return भरताना होणार्‍या चुका कशा टाळायच्या?

Income tax return भरताना होणार्‍या चुका कशा टाळायच्या?

[author title="प्रसाद पाटील" image="http://"][/author]
आयकर रिटर्न भरण्यास आता काही दिवसांचाच कालावधी बाकी आहे. तुम्हीही तुमचा आयकर रिटर्न भरण्याची तयारी करत असाल, तर रिटर्न फाईल करण्याआधी तुम्ही सगळी आवश्यक कागदपत्रे एकत्र केली आहेत का, ते पाहा!

अनेकदा काय होते की, आयकरदाते काही ठिकाणी रिटर्न फाईल करताना काही चुका करतात. तुमच्याकडून या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यासाठी कोणत्या गोष्टींबाबत सावधगिरी बाळगाायला हवी, याविषयी…

नाव, पत्ता चुकीचा लिहिणे

हीदेखील एक महत्त्वाची चूक आहे. आयकर रिटर्न फाईल करताना नाव, पत्ता आणि आधार कार्ड नंबर यासारखे तपशील अतिशय अचूकतेने लिहिणे आवश्यक असते. त्यात काही ना काही किरकोळ चूक राहते आणि लोक तसाच चुकीचा तपशील देतात. म्हणूनच नाव, पत्ता, कराची रक्कम, बँक खाते नंबर आणि इतर तपशील सावधानतेने लिहा आणि दोनदा तपासून पाहा. एखाद्या किरकोळ चुकीमुळे तुम्ही आयकर रिफंडला मुकू शकता. तुम्ही रिटर्न फाईल केल्यानंतर एखादी चूक झाल्याचे लक्षात आले, तर आयकर विभाग सुधारणा करण्याची संधी देतो.

डिडक्शनची मागणी न करणे

आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार अनेक प्रकारच्या गुंतवणुकीवर कर सवलतीची तरतूद आहे. तुम्ही पीपीएफ, विमा, इएलएसएसमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर दीड लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर तुम्हाला कर सवल मिळते. म्हणूनच जे काही डिडक्शन्स आहेत त्यांची नोंद आयटीआरमध्ये करा. रिटर्न भरतानाच डिडक्शन्सचा तपशील दिला नाहीत, तर नंतर ती स्वीकारली जात नाहीत.

मिळकतीचे सर्व स्रोत जाहीर करा

सर्व स्रोतांद्वारे मिळत असलेले आर्थिक उत्पन्न जाहीर करा. त्यातील एखादे आयकरमुक्त असू शकते. लॉटरी किंवा घर विकण्यातून मिळालेल्या पैशाचीही नोंद करा. बर्‍याचदा मुदत ठेव आणि रिकरिंग डिपॉझिट करमुक्त असल्याचा गैरसमज असतो.

फॉर्म वेळेवर भरा

आयकर रिटर्न ई-फाईल करताना रिटर्नवर तुम्हाला डिजिटल सही करायला सांगितले जाते. तुमची डिजिटल सही नसेल, तर एक पर्याय असा असतो की, तुम्ही आयटीआर 5 योग्य सही करून केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राकडे (सीपीसी) बंगळूर येथे पाठवून द्यावे. आयटीआर 5 रिटर्न फाईल केल्याच्या 120 दिवसांत पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने पाठवा. वरील मुदतीत तुम्ही आपल्या रिटर्नची ऑनलाईन ई-पडताळणी करावी हाही एक पर्याय आहे. असे केले नाही, तर तुम्ही रिटर्न फाईल केलीच नाही असे मानले जाईल. म्हणूनच आयटीआर 5ची पडताळणी न करण्याची चूक करू नका.

केवळ करयोग्य मिळकत न सांगणे

आयकर रिटर्न भरताना करयोग्य मिळकतीच्या जागी एकूण मिळकत भरण्याची चूक करदात्यांकडून नेहमी होते. फॉर्म 16 एमध्ये ही गडबड होते. करयोग्य मिळकत आणि एकूण मिळकत यातील गोंधळातून ही चूक होते. ही चूक टाळण्यासाठी 16 एच्या कॉलम 6 मध्ये नमूद केलेली मिळकतच लिहा.

फॉर्म 26 एएसची पडताळणी नाही

फॉर्म 26 एएसची पडताळणी न करण्याची चूक बर्‍याचदा होते. आपल्या मिळकतीच्या स्रोतातून जो कुणी (म्हणजे मालक किंवा अन्य कुणी) कर कापून घेतो, त्याला आपला पॅन नंबर बरोबर द्या. तुमच्या मालकाच्या फॉर्ममध्ये (फॉर्म 16 ए) टॅन किंवा पॅनचा तपशील चुकीचा असेल, तर तुम्हाला टीडीएस जमा होण्याचा लाभ मिळणार नाही. म्हणूनच फॉर्म 26 एएसची पडताळणी करा. त्यातून कर सरकारजमा झालेला आहे की नाही, हे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news