HDFC Bank Share Fall: HDFC बँकेचा शेअर अचानक का घसरला? 45 कोटींच्या व्यवहारामुळे बाजारात खळबळ; नेमकं काय घडलं?

Why HDFC Bank Shares Fell: MSRDC शी संबंधित कथित 45 कोटी रुपयांच्या व्यवहारांवरून अंतर्गत चौकशी सुरू असल्याच्या वृत्तांनंतर HDFC Bank चा शेअर 2 टक्क्यांहून अधिक घसरला.
Why HDFC Bank Shares Fell
Why HDFC Bank Shares FellPudhari
Published on
Updated on

Why HDFC Bank Shares Fell: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC Bank च्या शेअर्समध्ये काल मोठी घसरण पाहायला मिळाली. बँकेच्या शेअरमध्ये एका टप्प्यावर 2.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. मात्र ही घसरण कमकुवत आर्थिक निकालांमुळे किंवा व्यवसायातील मंदीमुळे झालेली नव्हती. यामागच कारण होतं बँकेच्या अंतर्गत चौकशी संबंधित समोर आलेला अहवाल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्याशी संबंधित सुमारे 45 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांवरून बँकेने अंतर्गत चौकशी (Internal Vigilance Investigation) सुरू केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर बाजारात खळबळ उडाली. यामुळे बँकेच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि त्याचा थेट परिणाम शेअरच्या किंमतीवर दिसून आला.

नेमकं प्रकरण काय आहे?

HDFC Bank ने काही वर्षांपूर्वी MSRDC कडील मोठ्या ठेवी आपल्या बँकेत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी बँकेचा बचत खात्यावरील व्याजदर सुमारे 3.5 टक्के होता. मात्र MSRDC ला किमान 6.01 टक्के परतावा अपेक्षित होता.

बँकिंग नियमांनुसार अशा प्रकारे वैयक्तिक पातळीवर वेगळे व्याजदर देणे शक्य नसल्याने, या व्याजातील फरकाची भरपाई दुसऱ्या मार्गाने केल्याचा आरोप आहे. वृत्तांनुसार, आर्थिक वर्ष 2024 आणि 2025 दरम्यान सुमारे 45 कोटी रुपये मार्केटिंग खर्चाच्या नावाखाली खर्च करण्यात आले.

हा पैसा थेट व्याज म्हणून न देता, रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेसाठी काम करणाऱ्या काही लोकांमार्फत दिला गेला असल्याचा आरोप आहे. अंतर्गत ऑडिटमध्ये या खर्चांबाबत काही विसंगती आढळल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, जवळपास 9 कोटी रुपयांच्या बिलांना समर्थन देण्यासाठी एकाच फोटोचा वापर तीन वेगवेगळ्या लोकांच्या इनव्हॉइसमध्ये करण्यात आल्याचा दावाही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

चिंतेचा मुद्दा काय आहे?

45 कोटी रुपयांची रक्कम HDFC Bank सारख्या मोठ्या बँकेसाठी फार मोठी नसली तरी गुंतवणूकदारांची चिंता पैशांच्या रकमेबद्दल नाही. चिंता आहे ती बँकेच्या अंतर्गत नियंत्रण यंत्रणा, मंजुरी प्रक्रिया, ऑडिट आणि पारदर्शकतेबद्दल.

बँकिंग क्षेत्रात विश्वास हे सर्वात मोठे भांडवल मानले जाते. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी असले तरी गव्हर्नन्सबाबत निर्माण झालेला संशय गुंतवणूकदारांना अस्वस्थ करू शकतो. याच कारणामुळे शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

HDFC Bank ची भूमिका काय?

HDFC Bank ने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बँकेच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, बँकेचे अंतर्गत नियंत्रण, ऑडिट आणि देखरेख यंत्रणा चांगली आहे. कोणत्याही मुद्द्यावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पाळल्या जातात. तसेच, निवडक माहितींवर आधारित चुकीचे निष्कर्ष काढले जात असल्याचा दावा करत बँकेने गैरप्रकाराचा आरोप नाकारला आहे.

Why HDFC Bank Shares Fell
Delivery Rider: बेरोजगार ते महिन्याला 45 हजारांची कमाई; EV बाईकने बदललं डिलिव्हरी बॉयचं आयुष्य, व्हायरल स्टोरीमुळे चर्चा

माजी अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे चर्चा

या संपूर्ण प्रकरणाची चर्चा आणखी वाढण्यामागे आणखी एक कारण आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक अतनू चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला होता.

राजीनामा पत्रात त्यांनी गेल्या दोन वर्षांत बँकेत काही अशा घडामोडी पाहिल्याचा उल्लेख केला होता, ज्या त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी आणि नैतिक तत्त्वांशी जुळत नव्हत्या. त्यांनी अधिक तपशील दिला नव्हता, मात्र त्यांच्या या विधानामुळे बाजारात बँकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता MSRDC प्रकरण समोर आल्यानंतर त्या जुन्या राजीनाम्याकडे पुन्हा लक्ष वेधले जात आहे.

Why HDFC Bank Shares Fell
DK Shivakumar Net Worth: फक्त एक कार नावावर; 263 कोटी रुपयांचं तर कर्जच आहे, डीके शिवकुमार यांची संपत्ती किती?

गुंतवणूकदारांनी काय करावं?

सध्या उपलब्ध माहितीनुसार, HDFC Bank च्या मुख्य व्यवसायावर, कर्जवाटपावर किंवा नफ्यावर तातडीचा परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत. मात्र बाजारात निर्माण झालेली चिंता ही विश्वास आणि पारदर्शकतेशी संबंधित आहे.

बँकिंग क्षेत्रात गव्हर्नन्सशी संबंधित प्रश्न आर्थिक आकडेवारीपेक्षाही अधिक संवेदनशील मानले जातात. त्यामुळे पुढील काही दिवसांत बँकेकडून अधिकृत आणि सविस्तर स्पष्टीकरण येते का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

सध्या तरी HDFC Bank च्या शेअरमधील घसरण ही व्यवसायातील घसरणीपेक्षा गव्हर्नन्स आणि विश्वासार्हतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बँकेत गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news