

PSU Bank Salary Hike: सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून वेतनवाढ आणि वेतन करारासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागत होती. मात्र आता केंद्र सरकारने याबाबत कठोर भूमिका घेतली असून सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने (DFS) सर्व सरकारी बँकांच्या प्रमुखांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 13व्या द्विपक्षीय वेतन कराराची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि ती जास्तीत जास्त 12 महिन्यांत पूर्ण करावी. याचा \अर्थ असा की, 1 नोव्हेंबर 2027 पासून लागू होणारा नवीन वेतन करार वेळेत लागू केला जाईल आणि कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही.
याआधीच्या वेतन करारांमध्ये मुख्य करार झाल्यानंतरही नियमांमध्ये बदल करण्यासाठी उशीर होत असे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा लाभ उशिरा मिळायचा. पण यावेळी सरकारने आधीच स्पष्ट केले की, नवीन वेतन करार लागू होण्यापूर्वी सर्व आवश्यक नियम आणि प्रक्रिया पूर्ण केल्या पाहिजेत.
या वेळी सरकारी बँकांची आर्थिक स्थितीही मजबूत असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. सरकारी बँकांनी गेल्या काही वर्षांत विक्रमी नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण नफा 1.05 लाख कोटी रुपये होता. तो FY24 मध्ये वाढून 1.41 लाख कोटींवर गेला आणि FY25 मध्ये तब्बल 1.78 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला.
फक्त नफाच नाही तर बँकांची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. बँकांचे एनपीए (थकीत कर्ज) मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना अधिक चांगले वेतन देण्याची क्षमता बँकांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.
या वेतन कराराचा फायदा केवळ सरकारी बँकांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाच नाही, तर काही जुन्या खासगी बँका आणि परदेशी बँकांतील कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यावेळी ‘तारीख पे तारीख’ न देता वेळेत वेतनवाढ मिळेल, अशी आशा कर्मचारी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.