

Gold-Silver Rate Today: जागतिक शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर ‘सेफ हेवन’ (सुरक्षित गुंतवणूक पर्याय) म्हणून सोनं आणि चांदीची मागणी पुन्हा एकदा वाढली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या घसरणीकडे गुंतवणूकदारांनी संधी म्हणून पाहिलं आणि मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. त्याचा परिणाम म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम ₹ 10 ने वाढलं असून, 22 कॅरेट सोन्याचाही भाव ₹ 10 नेच वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹ 1810 ने वाढला आहे, तर 22 कॅरेट सोनं ₹1660ने वर गेलं आहे.
तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर आता चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये एका किलो चांदीचा भाव दोन दिवसांत तब्बल ₹4600 ने वाढून ₹1,57,100 झाला आहे. मुंबई आणि कोलकात्यातही चांदीचा दर हाच असून, चेन्नईत मात्र एका किलो चांदीचा भाव ₹1,69,100 आहे, म्हणजे चारही महानगरांमध्ये सर्वाधिक भाव चेन्नईत आहेत.
‘किटको मेटल्स’चे वरिष्ठ विश्लेषक जिम वायकॉफ यांच्या मते, अमेरिकन शेअर बाजारातील मूल्यांकन, एआय संबंधित शेअर्समध्ये निर्माण झालेला ‘फुगा’ आणि जागतिक बाजारातील अस्थिरता या सगळ्यामुळे सोनं आणि चांदी यांची मागणी सुरक्षित गुंतवणुकीच्या स्वरूपात वाढत आहे. तसेच, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून वर्षाअखेरपर्यंत व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्यानेही भावात वाढ होत आहे.
मेहता इक्विटीजचे कमोडिटी विभागाचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांनी सांगितलं की, अमेरिकेमध्ये वाढत्या राजकीय अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं आणि चांदीत पुन्हा गुंतवणूक वाढत आहे. अलीकडील घसरणीच्या वेळी गुंतवणूकदारांनी खरेदीची संधी साधली आणि त्यामुळे दर पुन्हा वाढले.
विशेष म्हणजे, न्यूयॉर्कच्या महापौर निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला बसलेल्या धक्क्यामुळे अमेरिकेतील राजकीय अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गुंतवणूक बाजारावर दिसत आहे.