

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोने दरात आज बुधवारी (दि.११) वाढ झाली. शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर (Gold Prices Today) आज ६९४ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७७,८६९ रुपयांवर पोहोचला. याआधी मंगळवारी (दि.१०) सोन्याचा दर ७७,१७५ रुपयांवर होता. तर चांदीच्या दरात आज किरकोळ २८ रुपयांची वाढ दिसून आली. चांदीचा दर आज प्रति किलो ९२,८३८ रुपयांवर खुला झाला.
इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७७,८६९ रुपये, २२ कॅरेट ७१,३२८ रुपये, १८ कॅरेट ५८,४०२ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४५,५५३ रुपयांवर खुला झाला. ऑक्टोबर महिन्यात सोन्याने जीएसटीसह प्रतितोळा दर ८१ हजार ५०० रुपयांचा उच्चांक नोंदवला होता.
अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. व्याजदरात कपातीच्या शक्यतेने सोन्याच्या किमतीला आधार मिळत असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच जगभरातील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. विशेषतः चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने नोव्हेंबरमध्ये सोन्याची खरेदी पुन्हा सुरु केली. त्याचा प्रभाव दरावर दिसून येत आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जेव्हा भू-राजकीय तणाव वाढतो तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याच्या खरेदीकडे वळतात.