

Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या भावात घसरण होत असून, आज 30 जून रोजीही मौल्यवान धातूंच्या किमतीत पुन्हा घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत वातावरणाचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही झाला असून, सोने आता गेल्या सात महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. तर चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स गोल्ड (COMEX Gold) सुमारे 62 डॉलरनी घसरून 3,953.86 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचले. काही महिन्यांपूर्वी हेच सोने 5,595.51 डॉलर प्रति औंस या उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर भावात सातत्याने घसरण होत आहे. आता हे दर 4 हजार डॉलरच्या खाली आले आहे.
याचा परिणाम भारतीय सराफा बाजारातही दिसून आला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या ताज्या आकडेवारीनुसार सोन्या-चांदीच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत.
24 कॅरेट सोने: ₹1,41,343 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने: ₹1,29,991 प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट सोने: ₹1,06,433 प्रति 10 ग्रॅम
1 किलो चांदी: ₹2,21,600
जून महिन्याचा विचार केला तर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 30 दिवसांत 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 15,132 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. यामुळे सोन्याच्या किमती सातत्याने खाली येत असल्याचे चित्र आहे.
सोन्याचे दर सतत घसरत असल्याने अनेकांनी घरातील जुने दागिने विकण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत भारतीयांनी सुमारे 50 टन जुने सोने विकले, जे मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 43 टक्के अधिक आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा दर आणखी घसरून 1.20 लाख प्रति 10 ग्रॅम पर्यंत येऊ शकतो, अशी भीती अनेकांना वाटत आहे. त्यामुळे अनेक जण सध्याच्या किमतीत जुने सोने विकून रोख रक्कम जमा करत आहेत.
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत चांदीच्या दरात सुमारे 1.70 लाखांची घट झाली असून, त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींवर अवलंबून असते.