

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोने-चांदी दरात आज (१७ फेबुवारी) रोजी घसरण दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १,०३९ रुपयांनी कमी होऊन ८४,९५९ रुपयांवर खुला झाला. याआधी सोन्याचा दर ८५,९९८ रुपयांवर होता. त्यात आज घट दिसून आली. तर चांदीचा दर २,९३० रुपयांनी कमी होऊन प्रति किलो ९५,०२३ रुपयांवर खुला झाला. चांदीने २३ ऑक्टोबर २०२४ रोजी ९९,१५१ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक नोंदवला होता.
आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७७,८२२ रुपये, १८ कॅरेट ६३,७१९ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४९,७०१ रुपयांवर खुला झाला. गेल्या दीड महिन्यात शुद्ध सोन्याच्या दरात सुमारे ८,८०० रुपयांनी वाढ झाली. तर या कालावधीत चांदी प्रति किलोमागे ९ हजारांनी महागली. आयबीजेए (IBJA) कडून जारी केलेले सोने- चांदीचे दर देशभरात सारखेच असतात. हे दर कोणत्याही जीएसटीविना जारी केले जातात. दागिना खरेदी करताना त्यावर घडणावळ खर्च आणि जीएसटी द्यावा लागतो.
भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क लागू करण्याच्या धोरणांमुळे सोन्याच्या किमती वाढतच राहिल्या आहेत.
ग्राहकांनी नेहमीच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे हॉलमार्क असलेले सर्टिफाइड सोने खरेदी करावे. सोन्यावर ६ अंकी हॉलमार्क कोड असतो. त्याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच (Hallmark Unique Identification) HUID म्हटले जाते. हॉलमार्कच्या माध्यमातून सोने किती कॅरेटचे आहे, हे कळणे शक्य होते.
सराफा बाजारात २४ कॅरेट (९९९) हे शुद्ध सोने समजले जाते. पण, दागिने घडणावळीसाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. २२ कॅरेटमध्ये ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९ लिहिलेले असते. जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट (18 Carat Gold Rate) सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. १४ कॅरेट दागिन्यावर ५८५ असे नमूद केलेले असते.