

बाजार घसरणीस नवे नवे मुद्दे मिळत आहेत. Reciprocal Tariffs हा गेला सप्ताह गाजवणारा परवलीचा मुद्दा! खरे म्हणजे, त्याचे सुतोवाच डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान करत होते. परंतु, ते विजयी होऊन आता त्याच्या अंमलबजावणीची वेळ आली, तेव्हा बाजाराचे धाबे दणाणले. 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.
आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमध्ये दोन्ही देशांच्या दरम्यान कर समानता असली पाहिजे. परंतु, आताच्या करारांमधील सर्व शर्ती अमेरिकेच्या द़ृष्टीने घातक आहेत, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. अमेरिकेशी ज्या देशांचे व्यापारी संबंध आहेत, ते अमेरिकेतून त्यांच्या देशात आयात होणार्या वस्तूंवर जबर आयात कर लादतात. मात्र, त्यांच्या देशांकडून अमेरिकेत निर्यात होणार्या वस्तूंवर अमेरिका कमी दर आकारते. उदा. ब्राझीलमधून अमेरिकेत निर्यात होणार्या इथेनॉल उत्पादनांवर शून्य टक्के कर आहे. मात्र, अमेरिकेतून ब्राझीलमध्ये निर्यात होणार्या इथेनॉल उत्पादनांवर ब्राझील 18 टक्के कर आकारतो. ही गोष्ट अमेरिकेबरोबर व्यापार करणार्या सर्वच देशांच्या बाबतीत कमी-जास्त फरकाने अशीच आहे.
भारताच्या बाबतीत बोलायचे तर अमेरिकेतून आपल्या देशात आयात होणार्या वस्तूंवर सरासरी 17 टक्के शुल्क आहे. तर इथून अमेरिकेत निर्यात होणार्या वस्तूंवर अमेरिका 3.3 टक्के आयात शुल्क आकारते. भारतातून अमेरिकेत टेक्स्ट्राईल्स फार्मास्युटिकल्स आणि आयटी सर्व्हिसेस यांची निर्यात होते.
मागील सप्ताहात बाजारात जो हाहाकार माजला तो ह्याच एका गोष्टीमुळे! जवळपास तीन टक्क्यांनी कोसळून निफ्टी 50 तेवीस हजारांच्या खाली (22,929.25) बंद झाला. बँका निफ्टीही अडीच टक्क्यांनी घसरून 49,099.45 वर बंद झाला. सेन्सेक्सही, अडीच टक्के खाली आला. शिवाय असा एकही सेक्टरल इंडेक्स नाही, जो धाराशायी झाला नाही. निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स आणि रिअॅल्टी इंडेक्स यांची पुरती वाट लागली. दोन्ही इंडेक्स 10 टक्क्यांनी कोसळले. सरकारी कंपन्यांचे कोसळणे अव्याहतपणे सुरू आहे.
स्मॉल कॅप स्टॉक्स्नी दोन वर्षे गुंतवणूकदारांना अक्षरशः वेड लावले होते. निफ्टी स्मॉल कॅप 250 या इंडेक्सने 2024 मध्ये साडेसव्वीस टक्के तर 2023 मध्ये अठ्ठेचाळीस टक्के रिटर्नस् दिले होते. बहुतेक सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांच्या स्मॉल कॅप फंडस्नी Oversubscribe झाल्यामुळे गुंतवणूकदारांना आपली दारे बंद केली होती. परंतु, याच स्मॉल कॅप इंडक्सने आज गुंतवणूकदारांना पुरते घायाळ केले आहे. 2025 मधील YTD रिटर्नस् म्हणजे केवळ दीड महिन्यात हा इंडेक्स सव्वाअठरा टक्के कोसळला आहे. स्टॉकस्ची स्थिती तर याहून गंभीर आहेे.
दोन वर्षांपूर्वी गुंतवणूकदारांचे आकर्षण बनलेले शेअर्स आज चाळीस टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत. सप्टेंबर महिन्यात शिखरावर असणार्या या स्टॉक्स्मध्ये ऑक्टोबर महिन्यात नफा वसुली सुरू झाली. पुढे बाजाराच्या कसोटीवर न उतरणारे Q 3 चे आर्थिक निकाल आणि त्यानंतरची घसरण! Newgen Software च्या कंपनीने 2023 मध्ये 333 टक्के, तर 2024 मध्ये 118 टक्के असा जोरदार परतावा गुंतवणूकदारांना दिला. आज मागील दीड महिन्यात तो चाळीस टक्के घसरला आहे. Netweb Tech nologies आणि Sonata Software यांचीही तीच कक्षा! हे दोन्ही शेअर्स अनुक्रमे 36 टक्के आणि 23 टक्के घसरले आहेत. गुंतवणूकदारांनी बाजाराचा कल पाहून Systimatic पद्धतीने त्यांच्यामध्ये गुंतवणुकीची संधी शोधावी. परंतु, आपला गुंतवणूक कालावधी किमान पाच वर्षांचा असू द्यावा.
बाजाराची अशी दुर्दशा झाली असताना काही स्टॉकस् मात्र लढवय्या शिलेदारांप्रमाणे किल्ला लढवत आहेत. त्यामध्ये Bharti Airtel, God frey Philips, Bajaj Holding, SBI Life Insurance, Britannia, SBI Cards यांचा समावेश होतो. इंजिनिअरिंगमधील एक Diversified मोठी कंपनी सिमेन्सने आपले तिसर्या तिमाहीचे निकाल सादर केले. कंपनीचा एकत्रित नफा 22 टक्क्यांनी वाढून रु. 614.30 कोटी झाला. नवीन ऑडर्र्स्मध्येही 19.6 टक्क्यांची वाढ होऊन 4,258 कोटी रुपयांवर ऑर्डर बुक पोहोचली आहे. रु. 8,129.90 हा वर्षभरातील उच्चांक असणारा शेअर आज 4,982.95 रुपयांना मिळत आहे. एका आठवड्यात 8.83 टक्के, एक महिन्यात 14.21 टक्के, तर धढऊ 24.90 टक्के इतका हा शेअर खाली गेलेला आहे; पण एक वर्षातील उच्चांकापासून आज हा शेअर सुमारे 61 टक्के खाली आहे.