

नवी दिल्ली: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. 'लखपति दीदी' योजनेच्या यशानंतर, आता महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 'सी-मार्ट' (C-Mart) या नवीन योजनेची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी मोठे पाठबळ मिळणार आहे.
काय आहे 'सी-मार्ट' योजना?
सी-मार्ट योजनेचा मुख्य उद्देश महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला 'ब्रँड' म्हणून प्रस्थापित करणे हा आहे. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या 'लखपति दीदी' योजनेचा पुढचा टप्पा म्हणून याकडे पाहिले जात आहे.
योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
महिलांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बँकांकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी 'सी-मार्ट' नावाने विशेष विक्री केंद्रे स्थापन केली जातील.
या योजनेमुळे महिलांच्या लघु उद्योगांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळून त्यांच्या उत्पन्नात स्थिरता येईल.
शेतकरी आणि तरुणांनंतर महिलांवर विशेष लक्ष
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, हा अर्थसंकल्प प्रामुख्याने शेतकरी, युवा आणि सामान्य जनतेवर केंद्रित आहे. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी 'सी-मार्ट' ही योजना गेम-चेंजर ठरणार आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हेच देशाच्या विकासाचे मुख्य सूत्र आहे. 'लखपति दीदी' योजनेतून आम्ही महिलांना लक्षाधीश बनवण्याचे स्वप्न पाहिले, आता 'सी-मार्ट'च्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना जागतिक दर्जाची बाजारपेठ मिळवून दिली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केले.
महिलांना कसा होणार फायदा?
या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच मिळणार नाही, तर महिलांना पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि लॉजिस्टिक्समध्येही सरकार मदत करणार आहे. यामुळे घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला थेट मोठ्या बाजारपेठेशी जोडल्या जातील.