

देशात क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मची वाढती मागणी लक्षात घेता, या क्षेत्रातील आघाडीचे खेळाडू झेप्टो (Zepto), स्विगी इंस्टामार्ट (Swiggy Instamart) आणि ब्लिंकिट (Blinkit) यांना टक्कर देण्यासाठी आता ॲमेझॉनने (Amazon) आपली 'ॲमेझॉन नाऊ' (Amazon Now) ही नवीन सेवा सुरू केली आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी ॲमेझॉनने आता भारतातील क्विक डिलिव्हरी सेवेच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. कंपनीने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आपल्या जलद वितरण सेवेला सुरुवात केली आहे. या सेवेअंतर्गत, 'ॲमेझॉन नाऊ' वरून ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना अवघ्या 10 मिनिटांत घरपोच मिळतील. यापूर्वी गेल्या महिन्यात बंगळूरमध्ये या सेवेचा यशस्वी पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला होता.
आतापर्यंत ॲमेझॉनवरून कोणतीही वस्तू मागवल्यास ती घरी पोहोचायला एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, 'ॲमेझॉन नाऊ'च्या प्रवेशामुळे आता येत्या काळात या क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. जून महिन्यात ॲमेझॉनने आपली फास्ट डिलिव्हरी सेवा बंगळूरमध्ये सुरू केली होती. आता दिल्लीत या सेवेची सुरुवात पश्चिम दिल्लीतून करण्यात आली असून, लवकरच संपूर्ण शहरात तिचा विस्तार केला जाईल.
'इकॉनॉमिक टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अभिनव सिंह म्हणाले, "दिल्लीच्या मोठ्या भागात सेवा सुरू झाली असून आमचे नेटवर्क खूप वेगाने विस्तारत आहे. लवकरच राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या उर्वरित भागातही ही सेवा सुरू केली जाईल."
विशेष म्हणजे, ॲमेझॉनने गेल्या महिन्यातच भारतातील आपली डिलिव्हरी सेवा अधिक मजबूत करण्यासाठी २००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर, ॲमेझॉन देशभरात मोठ्या संख्येने 'डार्क स्टोअर्स' (Dark Stores) उघडण्यावर भर देत आहे. हे असे वेअरहाऊस असतात जे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारले जातात, जेणेकरून ऑर्डरची डिलिव्हरी सहज आणि वेगाने करता येईल.