पॅनकार्ड : चुकीचा पॅन नंबर देऊ नका अन्यथा… | पुढारी

पॅनकार्ड : चुकीचा पॅन नंबर देऊ नका अन्यथा...

नोकरदार आणि व्यावसायिक यांच्याकरिता पॅनकार्डचे महत्त्व किती असते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या पॅनकार्डचा वापर आपली ओळख पटवण्याबरोबरच इन्कम टॅक्स रिटर्न भरणे यासारख्या अनेक कामांकरिता केला जातो. पॅनकार्ड मुळे नोकरदार आणि व्यावसायिकांना आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. पॅनकार्डचा चुकीचा वापर केला तर कार्डधारकाला कठोर शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नोकरदार अथवा व्यावसायिकाने चुकीचा पॅनकार्ड नंबर सांगितला तर त्याबद्दल त्याला सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

मोठ्या रकमेची खरेदी करताना अनेक ठिकाणी आपल्याला पॅन क्रमांक विचारला जातो. अशा वेळी आपण हेतुपूर्वक चुकीचा पॅन क्रमांक सांगितला, असे सिद्ध झाले तर त्याकरिता संबंधिताला कडक शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. असा गुन्हा करणार्‍याला वीस हजार रुपयांपर्यंतचा दड भरावा लागणार आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांपासून सात वर्षांपर्यंतची शिक्षाही संबंधिताला होऊ शकते.

प्राप्तिकर कायदा 114 ई के नुसार विशिष्ट रकमेवरची खरेदी करताना ग्राहकाला आपला पॅन क्रमांक सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे. टॅक्स रिटर्न भरताना करदात्याने 25 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा हिशोब दिला नाही आणि नंतर ही गोष्ट उघडकीला आली, तर या गुन्ह्याबद्दल आयकर दात्याला सात वर्षे कारावाराची शिक्षा होऊ शकते.

मालमत्तेची खरेदी-विक्री करताना खरेदी करणारी व्यक्ती आणि विक्री करणारी व्यक्ती, या दोघांनाही आपल्या पॅनकार्ड चे विवरण द्यावे लागते. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये काळ्या पैशांचा वापर केला जाऊ नये, या हेतूनेच पॅन क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आयकर दात्याकडून किती रकमेचे व्यवहार केले जात आहे, यावर लक्ष ठेवणे सोपे जावे याकरिता प्राप्तिकर खात्याने मोठ्या आर्थिक व्यवहारामध्ये पॅन क्रमांकाचा वापर आवश्यक केला आहे. प्राप्तिकर विभागाला पॅन क्रमांकाच्या माध्यमातून करदात्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांची कुंडली कळू शकते. त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना करदात्याने, त्याने केलेल्या सर्व व्यवहारांचा उल्लेख रिटर्नमध्ये केला आहे की नाही, हे पॅन क्रमांकाद्वारे तपासले जाऊ शकते.

काही मंडळी अनेक व्यवहारांमध्ये आपला खरा पॅन क्रमांक देण्याऐवजी चुकीचा पॅन क्रमांक सांगतात. ही बाब उघडकीस आली तर त्या बद्दलही सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये जर संबंधिताने आपला पॅन क्रमांक दिला नाहीतर बँक, नोंदणी कार्यालय यांच्याकडून मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवले जाऊ शकतात.

करदात्याने आपल्या उत्पन्नाची आणि खर्च केलेल्या रकमेची खरीखुरी माहिती प्राप्तिकर विभागाला सादर केली नाही, तर त्या करदात्याकडून दुप्पट कर वसूल करण्याची कारवाई केली जाऊ शकते. एखादी व्यक्ती 20-25 वर्षांपासून एखाद्या कंपनीत नोकरी करत आहे आणि त्या व्यक्तीने आपल्या कंपनीकडे पॅन क्रमांक दिला नाही, तर त्याचा टीडीएस 20 टक्क्यांनी कापला जाईल. कंपनीकडून कापलेला कर रिटर्न भरून परताव्याद्वारे मिळवता येतो. त्याकरिता करदात्याला आपला पॅन क्रमांक सादर करणे आवश्यक असते. करदात्याने आपला पॅन क्रमांक सादर केला नाही, तर त्याचा कापून घेतलेला कर परत मिळणे मुश्कील होते.

* पॅनकार्डचा वापर आपली ओळख पटवण्याबरोबरच इन्कम टॅक्स रिटर्न भरणे यासारख्या अनेक कामांकरिता महत्त्वाचा.
* हेतुपूर्वक चुकीचा पॅन क्रमांक सांगितला तर संबंधिताला दंड व शिक्षा.
* मोठ्या रकमेची खरेदी करताना पॅन क्रमांक महत्त्वाचा.

रियाज इनामदार

Back to top button