उत्पन्नाची विभागणी कशी करावी? | पुढारी

उत्पन्नाची विभागणी कशी करावी?

अनेकांना दैनंदिन खर्चाच्या ओझ्यापुढे बचत, सुरक्षाकवच महत्त्वाचे वाटत नाही; पण हा विचार संकटात नेणारा ठरू शकतो. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात खर्चाची बाजू कमी करून बचतीची आणि सुरक्षिततेसाठीची बाजू भक्कम करणे आवश्यक आहे.

कमावणारा प्रत्येक जण आपल्या कमाईपैकी दैनंदिन खर्च, हौसमौज, भविष्यातील धोक्यांसाठीची तरतूद, चांगला परतावा मिळण्यासाठी गुंतवणूक, बचत यांची विभागणी करण्यासाठी आटापिटा करत असतो. यासाठी प्रत्येकाचे आकलन आणि विचार हा वेगळा असतो.

अनेकांना गुंतवणूक-बचत महत्त्वाची वाटते, तर काहींना आपत्कालीन प्रसंगीची तरतूद म्हणून विमाकवच आवश्यक वाटते. तरुणपिढी आपल्या रोजच्या गरजा भागवण्याला अधिक महत्त्व देतानाच कमाईसाठी गुंतवणूक करण्यावर भर देते. अनेकांना दैनंदिन खर्चाच्या ओझ्यापुढे बचत, सुरक्षाकवच महत्त्वाचे वाटत नाही; पण हा विचार संकटात नेणारा ठरू शकतो. कोव्हिडच्या संकटाने याची प्रचिती बहुधा सर्वांनाच आली असावी.

आर्थिक सल्लागारांच्या मते, सर्वसामान्य व्यक्तीने दर महिन्याला आपल्या उत्पन्नातील 15 ते 35 टक्के भाग हा आपत्कालीन गरज आणि निवृत्तीनंतरची तरतूद यांसाठी राखून ठेवला पाहिजे. याचाच अर्थ मिळकतीपैकी 60 ते 80 टक्के रक्कमच आपल्या खर्चासाठी, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी वापरायला हवी.

उदाहरणार्थ, एखाद्याचे मासिक उत्पन्न जर 25 हजार रुपये असेल तर अशा व्यक्तीने साधारणतः महिन्याकाठी 5 ते 10 हजार रुपये गुंतवणुकीसाठी, मेडिक्लेम, आरोग्यविमा यांचा हप्ता यासाठी राखून ठेवायला हवी. असे करणे सुरुवातीला खूप ओझे वाटू शकते. मात्र त्यातून मिळणारी आर्थिक हमी ही लाखमोलाची असते.

या राखीव निधीपैकी 30 टक्के रक्कम ही एसआयपी स्वरूपात गुंतवण्याचा पर्याय सध्याच्या काळात फायद्याचा ठरतो. यासाठी म्युच्युअल फंडचाच पर्याय निवडायला हवा असे नाही; तर पीपीएफ, आरडी यांसारख्या योजनाही यासाठी उपयुक्त ठरतात.

त्यानंतर उर्वरित रकमेपैकी 10 ते 15 टक्के रक्कम ही इक्विटीमध्ये किंवा विविध ठेव योजनांमध्ये गुंतवता येईल. गुंतवणुकीसाठी शिस्त असणे गरजेचे आहे. केवळ सहा ते आठ महिन्यांसाठी नाहीतर अनेक वर्षांसाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

आता राहिलेल्या रकमेमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा, मेडिक्लेम, आपल्या घरासाठीचा विमा, वाहनविमा यांचे गणित बसवावे.

आपण वयाच्या 50 व्या वर्षी निवृत्तीचा विचार करत असाल तर तुमचे इक्विटी एक्स्पोजर 10 टक्क्यांपेक्षा कमी ठेवू नये.
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात खर्चांची बाजू कमी करून बचतीची आणि सुरक्षिततेसाठीची बाजू भक्कम करणे आवश्यक आहे.

मिथिला शौचे

Back to top button