

गेल्या आठवड्यात आर्थिक विषयाबाबतची मते अनेक राष्ट्रधुरीणांनी मांडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 'समिट फॉर डेमॉक्रसी' ही परिषद ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. त्यामध्ये भाग घेताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत प्रदर्शित केले.
समाजमाध्यमे आणि अभासी चलन (क्रिप्टो करन्सी) यांच्यासाठी जागतिक पातळीवर निकष ठरवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. या दोन्ही घटकांचा वापर लोकशाहीला दुर्बल करण्यासाठी नाही, तर तिच्या सबलीकरणासाठी झाला पाहिजे असेही ते म्हणाले. हे सबलीकरण लोकशाही करू शकते. लोकशाहीने ते करून दाखवले आहे. यापुढेही ती करून दाखवेल.
लोकशाही हा भारतीय संस्कृतीचा आत्मिक गाभा आहेे. शतकानुशतके या देशावर परकीयांनी राज्य करूनही त्यांना भारतीयांच्या या लोकशाही मूल्यांचे दमन करता आले नव्हते. अगदी 2500 वर्षांपूर्वीही आर्य चाणक्यांनीही 'प्रजा सुखे राज्ञ: प्रजानां च हिते हितम्' असे लिहून ठेवले आहे. अनेक राजघराणी आता आणि अस्ताला गेली तरी भारताचे हे मूलतत्त्व अबाधितच राहिले.
भारताच्या अर्थव्यवस्थेला सबल करण्यात म्युच्युअल फंडांचा मोठा वाटा आहे. भारतात म्युच्युअल फंडांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या फंडांमधील गुंतवणूक सतत वाढत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राची जिंदगी एकूण 38.45 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये (गेल्या महिन्यात) इक्विटी फंडांच्या माध्यमातून 11,614 कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे 2021-2022 पहिल्या 9 महिन्यांत नोव्हेंबर अखेर इक्विटी फंडांची कामगिरी उत्तम झाली आहे.
2011 च्या नोव्हेंबर अखेर म्युच्युअल फंडांची एकूण जिंदगी फक्त 6.82 लाख कोटी रुपये होती. ती 10 वर्षांनंतर आता नोव्हेंबर 2021 अखेर ती 37.34 कोटी रुपयांवर पोहचली. म्हणजेच 10 वर्षांत तिच्यात 5 पट वाढ झाली. सध्या म्युच्युअल फंडांमध्ये भारतात एकूण 11.70 कोटी पोर्टफोलिओ आहेत.
कोव्हिड 19 मुळे निर्माण झालेल्या संकटानंतर पुन्हा जोरदार उभारी धरणार्या जगातील मोजक्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. तसा विश्वास व्यक्त केला आहे. इथे लसीकरण वेगाने झाल्यामुळे ओमायक्रॉन संसर्गाचा परिणामही सौम्य असेल. (Indian economy)
2020-2021 मार्च या आर्थिक वर्षातील दुसर्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) 8.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2019-20 या वर्षातील कोव्हिडपूर्व काळातील तिमाही वाढीपेक्षाही दुप्पट झाली आहे. कोव्हिड काळातही सतत 4 आर्थिक तिमाहीमध्ये वाढ दाखविणार्या जगातल्या महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत आहे. कृषी, उद्योग व सेवा या तिन्ही क्षेत्रांत ही वाढ दिसते.
एक ग्राहक म्हणून जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा भाजीपाला फळे, भरड धान्ये, खाद्यतेल याला आपण बरीच मोठी किंमत मोजत आहोत; पण सरकारी यंत्रणेनुसार महागाई 4.91 टक्क्यांवर गेली आहेे. प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी गिर्हाईक म्हणून आपण जातो तेव्हा किमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्याचे आपल्याला दिसते. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्रासाठी उत्तेजन देण्याचे ठरले. या क्षेत्रात केंद्रात एक महत्त्वाचा 76000 कोटी रुपयांचा प्रकल्प येऊ घातला आहे.
आज-काल सेमी कंडक्टरशिवाय आपले पाऊल पुढे पडत नाही. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये सेमी कंडक्टरचे स्थान अनन्यसाधारण आहे. संगणक, लॅपटॉप, स्मार्ट कार, वॉशिंग मशीन, एटीएम व स्मार्ट फोन इत्यादींचा यात समावेश आहे. त्यांची निर्मिती सिलीकॉनद्वारे केली जाते. सेमी कंडक्टर्स हे विद्युतवाहक असतात. त्यांना मायक्रोसर्किटमध्ये बसवले जाते. मायक्रोचिप्स, ट्रान्झीस्टर, आणि इलेक्ट्रॉनिक सेन्सरची निर्मिती सेमी कंडक्टर्सद्वारेच केली जाते.
'हाय एंड कम्प्युटिंग,'ऑपरेशन कंट्रोल' डेटा प्रोसेसिंग स्टोरेज वायरलेस कनेक्टिव्हीटी यासाठीही सेमी कंडक्टर्सचा वापर केला जातो. आर्टिफिशिअल इंटलिजन्स क्वांटम कम्प्युटिंग, अॅडव्हान्स्ड वायरलेस नेटवर्क, ब्लॅक चेन अॅप्लिकेशन्स' फाइव्हजी 'ड्रोन', रोबोटिक्स,'गेमिंग' यातही सेमी कंडक्टर्सचा वापर अपरिहार्य आहे. स्टेट बँकेची उपकंपनी असणार्या 'एसबीआय म्युच्युअल फंडाची लवकरच प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) होणार आहे. या माध्यमातून कंपनी 7,500 कोटी रुपये उभे करणार आहे. आतापर्यंतच्या म्युच्युअल फंडातील ही सर्वात मोठी समभाग विक्री असण्याची शक्यता आहे. तिला प्रचंड प्रतिसाद यावा.
'तत्त्वचिंतन'
यावेळचा 'चकाकता हिरा' म्हणून 'तत्त्वचिंतन 'या कंपनीची निवड केली आहे. ही कंपनी रासायनिक उत्पादने करते. तिची निर्यातही मोठ्या प्रमाणावर आहे. अंकलेश्वरला तिचे मुख्य उत्पादन असून दहेज डएन (स्पेशॅलिटी झोन) आणि संशोधन व विकास केंद्र बडोद्यात आहे. अमेरिका, युरोप व जपान इथे तिची उत्पादने निर्यात होतात. 24 वर्षांपेक्षा अधिक काळ तिथे रेकॉर्ड स्पृहणीय आहे. तिच्या शेअरचा सध्याचा भाव 2475 रुपयांच्या आसपास असून काही महिन्यांत तो 2900 रुपयांपर्यंत जावा.
तिचे शेअरगणिक उपार्जन आर्थिक वर्ष मार्च 2022, 2023 व 2024 या वर्षात अनुक्रमे 55 रुपये, 62 रुपये, 73 रुपये असण्याचा अंदाज आहे. पुढील काही वर्षांत तिची भांडवली गुंतवणूक 4 बिलीयन रुपयापेक्षा जास्त असेल. म्हणजेज ती 10 बिलीयन रुपयापेक्षाही जास्त वाढेल. नवीन फ्युओराईन, गुजराथ फ्युरो, केमफ्रास्ट, गॅलॅक्सी, सुदर्शन केमिकल्स या कंपन्यांसारख्या क्षेत्रात ती आघाडीवर आहे. आपल्या भागभांडारात वैविध्य आणण्यासाठी तिचा जरूर विचार करावा.
डॉ. वसंत पटवर्धन