Nifty and Sensex : अर्थवार्ता

Nifty and Sensex : अर्थवार्ता
Published on
Updated on

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) निर्देशांकामध्ये अनुक्रमे 314.50 अंक व 1090.21 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 17511.3 अंक व 58786.67 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) निर्देशांकांमध्ये एकूण 1.83 टक्के व 1.89 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली.

* रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत देशातील व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय. सलग नवव्या बैठकीनंतरदेखील व्याजदर जैसे थे. पाच विरुद्ध एक अशा बहुमताने रेपो रेट 4 टक्के, तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम. आर्थिक वर्ष 2022 साठी देशाचा जीडीपी वृद्धी दर 9.5 टक्क्यांवर राहण्याचे संकेत. रिझर्व्ह बँकेने दिले तर महागाई दर 5.3 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे.

* स्मार्ट फोन नसलेल्या फीचर फोन्ससाठीदेखील आता 'यूपीआय' डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केले.

* ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढ निर्देशांक 3.2 टक्क्यांवर (आयआयपी ग्रोथ) यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हा निर्देशांक 3.3 टक्के, तर ऑगस्टमध्ये 12 टक्के होता.

* क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) व्यवहारावर नियंत्रण तसेच नियमन करण्याचे काम लवकरच भांडवल बाजार नियंत्रक (कॅपिटल मार्केट रेग्युलेटर) 'सेबी'कडे सोपवले जाण्याची शक्यता. डीमॅट अकाऊंटसारखेच आभासी चलन साठविण्यासाठी सरकारमान्य 'क्रिप्टोकरन्सी वॉलेट' आणण्यासाठी प्रयत्न चालू. यासाठी लवकरच 'क्रिप्टोकरन्सी बिल' सरकारतर्फे सादर केले जाणार. तसेच देशात सध्या चलनात असणार्‍या काही खासगी तसेच अवैध क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्याच्या दिशेने केंद्र सरकारची पावले.

* 'एलआयसी' या सरकारी कंपनीला खासगी बँक 'इंडसिंड बँक'मध्ये 10 टक्क्यांपर्यंत हिस्सा वाढविण्याची केंद्र सरकारतर्फे तसेच रिझर्व्ह बँकेतर्फे अनुमती मिळाली. यापूर्वी कोटक बँकेमधील हिस्सा वाढविण्यासाठी अनुमती मिळाली होती. सध्या 'एलआयसी'चा इंडसिंड बँकेत 4.95 टक्के हिस्सा आहे.

* गत सप्ताहात अखेरच्या दिवशी (शुक्रवारी) रुपया डॉलरच्या तुलनेत 18 पैसे कमजोर होऊन प्रतिडॉलर 75.78 रुपये स्तरावर बंद झाला. मागील 16 महिन्यांचा हा नीचांकी दर आहे. अमेरिकेत महागाई दर 6.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील सुमारे 30 वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे जगभरातील व्याजदर पुन्हा वाढण्यास सुरुवात होणार असून, याच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेण्यास प्राधान्य देत आहेत. या सर्वांमुळे रुपया चलन डॉलरच्या तुलनेत कमजोर होत आहे.

* वाहनांमध्ये असणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या सेमी कंडक्टर 'चिप'ची जगभरात टंचाई. नोव्हेंबर महिन्यात या कारणाने भारतातील वाहन विक्री मंदावली. प्रवासी वाहन विक्रीने मागील 7 वर्षांचा, दुचाकीने 11 वर्षांचा, तर तीनचाकी वाहनविक्रीने मागील 19 वर्षांचा तळ गाठला. चारचाकी गाड्यांच्या विक्रीमध्ये तब्बल 19.44 टक्क्यांची घट नोंदवली गेली. दुचाकींच्या विक्रीत 34 टक्के, तर तीनचाकी वाहनांच्या विक्रीत 7 टक्क्यांची घट झाली.

* निधीअभावी रखडलेल्या 243 प्रकल्पांसाठी केंद्र सरकार प्रायोजित (स्पॉन्सर्ड) गुंतवणूक फंडाकडून 22,972 कोटींचा निधी मिळणार. याद्वारे 1,41,045 घरांचे बांधकाम पूर्णत्वास जाणार. एकूण 99 प्रकल्पांसाठी 9743 कोटींच्या मदत निधीची अंतिम मान्यता मिळाली आहे, तर 144 प्रकल्पांसाठी 13,229 कोटींच्या मदतनिधीस प्राथमिक तत्त्वतः मान्यता (प्रिलिमनरी सँक्शन) मिळाली आहे.

* आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरण्यापूर्वी 'ओला' कंपनी 1 अब्ज डॉलर्सचा निधी इक्विटी आणि रोख्यांच्या माध्यमातून उभा करणार. नुकताच इडेलवाईज आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून 'ओला' कंपनीने 1049 कोटींचा निधी उभा केला आहे. सध्या या कंपनीचे बाजारमूल्य 7.5 अब्ज डॉलर्सच्या जवळपास आहे.

* केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 65 हजार किलोमीटर्सची राष्ट्रीय महामार्गाची कामे चालू आहेत. 30 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार 10.4 लाख कोटींची यासाठी गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राचा आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 54 हजार कोटींचे 11,323 कि.मी. लांबीचे 368 राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्पांची कामे चालू आहेत.

* नोव्हेंबर महिन्यात इक्विटी प्रकारामध्ये भारतीय भांडवल बाजारात 11,615 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. हा मागील चार महिन्यांचा उच्चांक आहे.

* 3 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहाअखेर भारताची परकीय गंगाजळी 1.783 अब्ज डॉलर्सनी घटून 635.905 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news