Byju’s इंडियाचे CEO अर्जुन मोहन यांचा राजीनामा, रविंद्रन यांनी पुन्हा घेतली जबाबदारी | पुढारी

Byju's इंडियाचे CEO अर्जुन मोहन यांचा राजीनामा, रविंद्रन यांनी पुन्हा घेतली जबाबदारी

पुढारी ऑनलाईन : एडटेक स्टार्टअप ‘बायजू’मधील एक नवीन घडामोड समोर आली आहे. बायजू इंडियाचे सीईओ अर्जुन मोहन (Byju’s India CEO Arjun Mohan) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ते सीईओ पदावरून ७ महिन्यांत पायउतार झाले आहेत. बायजूचे सीईओ अर्जुन मोहन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून संस्थापक बायजू रवींद्रन यांनी दैनंदिन कामकाजाविषयी जबाबदाऱ्या पुन्हा हाती घेतल्या आहेत, असे कंपनीने १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, व्यवसाय कमी झाल्यामुळे ते इतर संधींचा पाठपुरावा करण्यासाठी सीईओ पदावरून पायउतार होत असल्याची पुष्टी अर्जुन मोहन यांनी केली आहे. आता बायजू रवींद्रन दैनंदिन कामकाज हाताळतील. यामुळे त्यांचे मनोबल वाढेल, असेही ते म्हणाले.

सप्टेंबर २००३ मध्ये मृणाल मोहित यांच्यानंतर बायजूने अर्जुन मोहन यांच्याकडे सीईओ पदाची जबाबदारी दिली होती. पण अवघ्या ७ महिन्यांत त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे.

अडचणीत सापडलेल्या एडटेक कंपनी बायजूने नुकतीच केवळ एका फोन कॉल्सवर नोकरकपात सुरू केली होती. कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (पीआयपी) वर न ठेवता अथवा त्यांना नोटीस पिरियड न देता त्यांना सोडून जाण्यास सांगितले जात असल्याचे वृत्त समोर आले होते.

बायजूने (Byju’s) नुकतेच त्यांचे काम लर्निंग ॲप, ऑनलाइन क्लासेस आणि ट्यूशन सेंटर्स आणि टेस्ट-प्रीपरेशन या तीन केंद्रित विभागांमध्ये एकत्रित केले आहे. या प्रत्येक युनिटमध्ये स्वतंत्र नेतृत्त्व असेल. जे नफा सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्रपणे व्यवसाय सांभाळतील. कारण कंपनी सध्या आर्थिक अडचणींच्या गंभीर समस्यांशी सामना करत आहे.

हे ही वाचा :

Back to top button