Stock Market Updates | शेअर बाजाराने उभारली नव्या विक्रमाची गुढी, सेन्सेक्स प्रथमच ७५ हजार पार, निफ्टी २२,७५० वर | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजाराने उभारली नव्या विक्रमाची गुढी, सेन्सेक्स प्रथमच ७५ हजार पार, निफ्टी २२,७५० वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudhi Padwa 2024) मंगळवारी (दि.९) भारतीय शेअर बाजाराने नव्या विक्रमाची गुढी उभारली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ७५ हजारांचा टप्पा पार करत नव्या उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टीने पहिल्यांदाच २२,७५० चा उच्चांक गाठला. विशेषतः आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून येत आहे. इन्फोसिस, बजाज, मारुती सुझुकी आणि एचडीएफसी बँक सारख्या हेवीवेट शेअर्समधील तेजीमुळे शेअर बाजाराला विक्रमी उच्चांकावर पोहोचण्यास मदत झाली आहे.

सेन्सेक्स आज ७५,१२४ अंकावर खुला झाला. त्यानंतर तो ७५ हजारांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सवर इन्फोसिस, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, रिलायन्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप देखील हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.

निफ्टीने आज सुरुवातीच्या व्यवहारात २२,७६५ चा सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीवर इन्फोसिस, अपोलो हॉस्पिटल, LTIMindtree, एचसीएल टेक आणि हिरोमोटोकॉर्प हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर आयशर मोटर्स, बीपीसीएल, टायटन हे शेअर्स घसरले आहेत. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांक तेजीत आहेत.

संबंधित बातम्या

अमेरिकेतील बाजारात सुस्ती, आशियात तेजी

जागतिक स्तरावर नजर टाकल्यास अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक सोमवारी सपाट पातळीवर बंद झाले. कारण आता गुंतवणूकदारांचे लक्ष १० एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. पण अमेरिकेतील शेअर बाजारातील सुस्त स्थितीचा भारतीय बाजारावर आज परिणाम दिसून आला नाही. सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी तेजी कायम ठेवली आहे.

अमेरिकेच्या बाजारातील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ३० निर्देशांक ०.०३ टक्क्यांनी घसरून बंद झाला. तर S&P 500 ०.०४ टक्क्यांनी खाली आला. दरम्यान, Nasdaq Composite ०.०३ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

दरम्यान, चीनचा शांघाय कंपोझिट वगळता आशियातील बहुतांश प्रमुख निर्देशांक सकारात्मक व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात जपानचा निक्केई २२५, हाँगकाँगचा हँग सेंग आणि सिंगापूरचा एफटीएसई स्ट्रेट टाइम्स निर्देशांक तेजीत आहेत.

देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी

शांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सोमवारी ३,४७०.५४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी ६८४.६८ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली.

हे ही वाचा ;

 

Back to top button