‘आर्थिक प्रकृती’च्या तपासणीसाठी ‘या’ आहेत ८ चाचण्या, जाणून घ्या अधिक | पुढारी

‘आर्थिक प्रकृती’च्या तपासणीसाठी 'या' आहेत ८ चाचण्या, जाणून घ्या अधिक

जगदीश काळे

आपली ‘आर्थिक प्रकृती’ ठीक आहे की नाही, या प्रश्नाचे तयार उत्तर आपल्याला कोणत्याही पुस्तकात मिळत नाही आणि कोणताही आर्थिक सल्लागारसुद्धा तुमच्या ‘आर्थिक प्रकृती’ची गॅरंटी देत नाही. परंतु, आठ प्रश्न स्वतःला विचारून त्यांची प्रामाणिक उत्तरे शोधल्यास आपल्या आर्थिक स्थितीचा चपखल अंदाज आपल्याला येऊ शकतो आणि त्यावरून आपण पुढील अनेक निर्णय विनासायास घेऊ शकतो.

ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गरजा भिन्न-भिन्न असतात, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आर्थिक संपन्नतेच्या कल्पनाही वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ, छोट्या गावात राहणार्‍या व्यक्तीच्या आर्थिक गरजा महानगरात राहणार्‍या नोकरदार व्यक्तीच्या गरजांपेक्षा वेगळ्या असतात. त्याप्रमाणेच प्रत्येक महिन्याला मोठा पगार मिळविणे, पगाराच्या पैशातून दरमहा मोठी बचत करणे, गरजेनुसार आरोग्य विमा किंवा मुदती विमा घेणे, घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड या सर्व बाबी यथासांग पार पडत असल्या तरी आर्थिकद़ृष्ट्या तुम्ही सुद़ृढ आहातच असे म्हणण्याचा हा निकष होऊ शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्ती स्वतःला काही प्रश्न विचारून आपल्या आर्थिक स्थितीचे आकलन स्वतःच करू शकते. अशा आठ प्रश्नांची माहिती आपण घेऊया…

मासिक उत्पन्नाच्या 20-30 टक्के बचत होते?

प्रत्येक महिन्यात आपल्या मासिक उत्पन्नाच्या 20 ते 30 टक्के बचत करण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या अखेरीस बचतीच्या खाती चांगली रक्कम नसेल, तर भविष्यकालीन आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने ही नकारात्मक स्थिती आहे, हे ओळखा.

दरवर्षी उत्पन्नात वाढ होते का?

आपल्या आर्थिक वाढीचे मोजमाप केवळ एका वर्षात करू नका. त्याऐवजी गेल्या दोन किंवा पाच वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी आजच्या परिस्थितीची तुलना करून पाहा. आपला आर्थिक आलेख वाढतो आहे की नाही, हे दोन गोष्टींवरून ओळखता येते. पहिली गोष्ट म्हणजे केलेली बचत किंवा गुंतवणूक यावर योग्य दराने व्याज किंवा परतावा मिळत आहे की नाही. दुसरा निकष म्हणजे तुमचे उत्पन्न ज्या दराने वाढत आहे, त्या दराने तुमची गुंतवणूक किंवा बचत वाढत आहे की नाही.

क्रेडिट कार्डवरील अवलंबित्व किती?

क्रेडिट कार्डचा वापर करण्यात काहीच गैर नाही; परंतु पूर्णपणे क्रेडिट कार्डवरच भरवसून राहणे योग्य नाही. जर आजच्या घडीला तुमची सर्व क्रेडिट कार्ड एखाद्याने काढून घेतली, तर कार्डाविना तुम्हाला जीवनक्रम चालविणे शक्य होईल का? काही जण क्रेडिट कार्ड घेण्याबरोबरच व्यक्तिगत कर्जही घेतात आणि कर्जफेडीसाठी ‘ईएमआय’ द्यावे लागतात. आर्थिक आरोग्यासाठी हे चांगले चिन्ह नव्हे.

गरजेनुसार विमा पॉलिसी घेतली आहे का?

आयुर्विमा, मुदती विमा, आरोग्य विमा यांसारख्या मूलभूत विमा पॉलिसींबरोबरच तुमच्या कर्जाचा विमा तुम्ही उतरविला आहे का? गृहकर्ज किंवा वाहनकर्जासारखी मोठ्या रकमेची कर्जे घेताना या कर्जांचा विमा उतरविणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही समजा, गृहकर्जाचे डाऊन पेमेंट व्यवस्थित केले आहे; परंतु काही कारणांमुळे मासिक हप्ता भरण्यास तुम्ही असमर्थ ठरलात, तर अशा स्थितीत त्या कर्जाच्या रकमेइतका विमा उतरविणे आवश्यक आहे.

आणीबाणीच्या स्थितीसाठी निधी उभारला आहे का?

भविष्यात येऊ घातलेल्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी आर्थिकद़ृष्ट्या सुद़ृढ असणे आवश्यक असते. त्यासाठी ‘आपत्कालीन निधी’ असलेला बरा. असा निधी उभारल्यास संकटाच्या वेळी तुम्हाला तुमच्या बचत पावत्या मोडाव्या लागत नाहीत. शिवाय, आपली गुंतवणूक महागाईच्या प्रभावापासून सुरक्षित राखण्यासाठीही आपत्कालीन निधी उभरणे हा एक चांगला पर्याय आहे. या निधीत तीन महिन्यांच्या तुमच्या खर्चाइतकी रक्कम असायला हवी. आपल्या काही खर्चांवर नियंत्रण मिळवून तसेच थोडी थोडी बचत करून असा आपत्कालीन निधी उभारणे प्रत्येकाला शक्य असते. संकटकाळी दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीतून पैसे काढल्यामुळे परतावा कमी होऊन तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

महागाईच्या प्रमाणात गुंतवणुकीचा परतावा मिळतो?

महागाई दर नेहमी वाढत असतो. या दराच्या प्रमाणात गुंतवणुकीवरील परतावा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मुदतीच्या ठेवीचा पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानला जातो. कारण त्यावर निश्चित स्वरूपाचे उत्पन्न मिळते; तसेच बाजारातील स्थितीचा या गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही; परंतु दीर्घकालीन स्वरूपात मुदतीच्या ठेवींमध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी योग्य नाही कारण मुदतीच्या ठेवींवर मिळणारा व्याजदर महागाईच्या दराच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे वाढत्या महागाईचा विचार करून मुदतीनंतर महागाई वाढीच्या दरापेक्षा अधिक दराने परतावा मिळेल, याची काळजी घेऊनच गुंतवणुकीचा पर्याय निवडणे चांगले.

क्षमतेपेक्षा अधिक कर्जाचा बोजा आहे का?

तुमच्या उत्पन्नाचा जेवढा हिस्सा तुम्ही कर्जाच्या ‘ईएमआय’च्या स्वरूपात खर्च करता, तेवढी तुमची आर्थिक प्रकृती क्षीण आहे, हे ओळखले पाहिजे. आपल्या उत्पन्नाचा चाळीस टक्क्यांहून अधिक हिस्सा कर्जाच्या हप्त्यावर खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. असे केल्यास तुम्ही तुमचा घरखर्च दीर्घकाळ व्यवस्थित चालवू शकाल.

आर्थिक लक्ष्य निश्चित केले आहे का?

भविष्यासाठी बचत करताना आपले भविष्यकालीन आर्थिक लक्ष्य कोणते आहे, हे सुनिश्चित करून त्यासाठीच बचत असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर पाच वर्षांनी तुम्हाला स्वतःचे घर घ्यायचे आहे का? तुमच्यावरील सर्व कर्जे तुम्हाला एखाद्या विशिष्ट वर्षापर्यंत फेडायची आहेत का? काही वर्षांनंतर दरमहा चाळीस हजार रुपये पगार मिळावा, अशी योजना तुम्हाला करायची आहे का? नोकरीच्या बरोबरीने व्यवसाय सुरू करण्याची भविष्यात तुमची योजना आहे का? असे प्रश्न स्वतःला विचारा. बचत किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी त्यामागील हेतू निश्चित असला पाहिजे.

Back to top button