Stock Market Closing Bell | RIL मधील खरेदीमुळे बाजारात तेजीचा माहौल, गुंतवणूकदारांना १.१३ लाख कोटींचा फायदा | पुढारी

Stock Market Closing Bell | RIL मधील खरेदीमुळे बाजारात तेजीचा माहौल, गुंतवणूकदारांना १.१३ लाख कोटींचा फायदा

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात बुधवारी जोरदार खरेदीची नोंद झाली. विशेष म्हणजे जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत असूनही भारतीय शेअर बाजाराने तेजीत व्यवहार केला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ६०० अंकांनी वाढून ७३ हजाराला स्पर्श केला. तर निफ्टी २२,१०० च्या पातळीवर राहिला. त्यानंतर सेन्सेक्स ५२६ अंकांच्या वाढीसह ७२,९९६ वर बंद झाला. तर निफ्टी ११८ अंकांनी वाढून २२,१२३ वर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सच्या मजबूत वाढीचा शेअर बाजाराला फायदा झाला.

एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रात खरेदी दिसून आली. ऑटो, कॅपिटल गुड्स, पॉवर, रियल्टी, टेलिकॉम ०.५-१ टक्क्यांनी वाढले, तर मेटल, आयटी, मीडिया प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढला.

गुंतवणूकदारांना १.१३ लाख कोटींचा फायदा

बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३८३.७० लाख कोटींवर पोहोचले. २६ मार्च रोजी ते ३८२.५७ लाख कोटी होते. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १.१३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

रिलायन्स टॉप गेनर

सेन्सेक्स आज ७२,६९२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३ हजारांवर पोहोचला. सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स टॉप गेनर होता. हा शेअर्स आज सुमारे ४ टक्क्यांनी वाढून २,९९८ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर तो २,९८५ रुपयांवर स्थिरावला. त्यासोबतच मारुती, बजाज फायनान्स, एलटी, सन फार्मा, कोटक बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले.

sensex closing

निफ्टीवर रिलायन्स, बजाज ऑटो, मारुती, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले. तर हिरो मोटोकॉर्प, टाटा कन्झ्युमर, यूपीएल, विप्रो, डॉ. रेड्डीज हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

मारुती सुझुकीचे बाजार भांडवल ४ लाख कोटींवर

मारुती सुझुकीचा शेअर्स आज बीएसईवर ४ टक्क्यांनी १२,७२५ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर हा शेअर्स १२,५५० रुपयांवर स्थिरावला. या तेजीमुळे Maruti Suzuki India ही ४ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी भारतातील १९वी सूचीबद्ध कंपनी बनली.

जागतिक बाजार

अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल घसरून बंद झाले होते. आशियाई बाजाराताही आज काही प्रमाणात कमकुवत स्थिती दिसून आली. हाँगकाँगचा हँगसेंग १.३६ टक्क्यांनी घसरला. तसेच चीनच्या बाजारातील निर्देशांक आज घसरले. दरम्यान, जपानचा निक्केई ०.९ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मंगळवारी १०.१३ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ५,०२४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

 हे ही वाचा :

Back to top button