Stock Market Closing Bell | तेजीचा ‘झंझावात’! सेन्सेक्स ५३९ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदार ५.८८ लाख कोटींनी श्रीमंत, ‘या’ ४ घटकांनी मिळाली चालना | पुढारी

Stock Market Closing Bell | तेजीचा 'झंझावात'! सेन्सेक्स ५३९ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदार ५.८८ लाख कोटींनी श्रीमंत, 'या' ४ घटकांनी मिळाली चालना

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैथे थे ठेवण्याच्या निर्णयाचे सकारात्मक पडसाद आज गुरुवारी (दि.२१) भारतीय शेअर बाजारात उमटले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७५० अंकांनी वाढला. तर निफ्टी ५० निर्देशांकाने २२ हजारांच्या महत्त्वपूर्ण स्तरावर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ५३९ अंकांनी वाढून ७२,६४१ वर बंद झाला. तर निफ्टी १७२ अंकांच्या वाढीसह २२,०११ वर स्थिरावला. आज सर्व क्षेत्रात चौफेर खरेदी दिसून आली. (Stock Market Closing Bell)

सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार केला. मेटल, कॅपिटल गुड्स, फार्मा, रियल्टी आणि पीएसयू बँक सुमारे २ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप २.३ टक्क्यांनी तर बीएसई स्मॉलकॅप २ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ५.८८ लाख कोटी रुपयांनी वाढून ३८० लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी जूनमध्ये व्याजदर कपातीची शक्यता कामय ठेवली आहे. यूएस फेड रिझर्व्हने त्यांच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीत व्याजदर ५.२५-५.५५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आणि भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक दिवसभरात सुमारे १ टक्क्यांनी वाढले.

‘हे’ शेअर्स तेजीत

सेन्सेक्सने आज ७२,५०० च्या पातळीवर व्यवहार केला. एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, एसबीआय, टेक महिंद्रा, एलटी, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले. तर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, मारुती या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टीवर बीपीसीएल, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, कोल इंडिया हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले. तर भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स घसरले.

डीमार्ट कंपनीचे शेअर्स वधारले

डी-मार्ट (D-Mart) रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली. आज हा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढला. त्यानंतर दुपारच्या सत्रात हा शेअर्स २ टक्क्यांच्या वाढीसह ४,१५७ रुपयांवर होता. (Avenue Supermarts Share Price)

व्यापक खरेदी

देशांतर्गत बाजारातील सर्व क्षेत्रांनी आज सकारात्मक व्यवहार केला. निफ्टी मेटल आणि निफ्टी पीएसयू बँकेने सर्वाधिक २.५ टक्के वाढ नोंदवली. व्यापक बाजारानेही बेंचमार्कपेक्षा जास्त कामगिरी केली.

आयटी शेअर्स तेजीत

आयटी शेअर्समधील तेजीमुळे गुरुवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीही वधारले. यूएस फेडरल रिझर्व्हने या वर्षी तीन दर कपातीचा अंदाज कायम ठेवल्यानंतर जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. निफ्टी आयटीवर LTTS, Coforge, Persistent Systems, एमफॅसिस (MPHASIS) Wipro हे शेअर्स आघाडीवर राहिले. निफ्टी IT सुमारे १ टक्क्याने वाढला.

यूएस फेडचा निर्णय

यूएस फेडरल रिझर्व्हने अपेक्षांनुसार व्याजदर जैसे थे ठेवला आहे. फेड अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी जूनमध्ये व्याजदर कपातीची शक्यता कायम ठेवली आहे. तसेच फेडने यावर्षी तीन व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. या निर्णयामुळे भारतासह जगभरातील बाजाराला चालना मिळाली.

जागतिक बाजारात तेजीचा माहौल

जागतिक शेअर बाजारांनी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात कोणताही बदल न ठेवण्याच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. अमेरिकेतील तीन प्रमुख निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाले. आशियाई बाजारातील निर्देशांकही वधारले. जपानचा निक्केई (Japan’s Nikkei) २ टक्क्यांनी वाढून ४०,८०० च्या नवीन शिखरावर गेला.

हे ही वाचा :

Back to top button