Stock Market | जाणून घ्या शेअर मार्केटमधील घडामोडी | पुढारी

Stock Market | जाणून घ्या शेअर मार्केटमधील घडामोडी

* गतसप्ताहात भांडवल बाजाराच्या द़ृष्टीने 2 मार्च रोजी एक अनोखी घटना घडली. नॅशनल स्टॉक एक्सेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंज या दोन्ही बाजारांमध्ये शनिवारच्या दिवशी प्रथमच व्यवहार करण्यात आले. स्पेशल ट्रेडिंग सेशनच्या अंतर्गत दोन तासांसाठी व्यवहार खुले करण्यात आले. आणीबाणीच्या स्थितीत जसे की, हॅकर्सने एनएससी किंवा बीएससीच्या सर्व्हरवर हल्ला चढवल्यास तातडीची उपाययोजना म्हणून प्राथमिक वेबसाईटला (प्रायमरी वेबसाईट) पर्याय म्हणून आणखी एक सेंकडरी वेबसाईटची सुविधा तपासणी करण्यासाठी भांडवल बाजारांनी ही पर्यायी व्यवस्था उभी केली आहे. करण्यासाठी भांडवल बाजारांनी ही पर्यायी व्यवस्था उभी केली आहे. यामध्ये पहिल्या सत्रामध्ये प्राथमिक वेबसाईटवरून व्यवहार करण्यात आले. तर दुसर्‍या सत्रात पर्यायी वेबसाईटवरून व्यवहार करण्यात आले. बाजारामध्ये तरलता (लिक्विडिटी) कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर बाजार वर-खाली होऊ नये म्हणून समभाग किमतीवर 5 टक्क्यांची मर्यादा (5 टक्के मॅक्झिमम सर्किट)ची मर्यादा घालण्यात आली. शनिवारच्या सत्रात सेन्सेक्स 60.80 अंकांनी वधारून 73.860 तसेच निफ्टी 39.65 अंकांनी वधारून 22,378 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने शनिवारच्या सत्रात आतापर्यंतची सर्वोच्च पातळी (11 वा. 21 मि. दरम्यान) म्हणजेच 74,021 अंक दर्शवली आणि सत्राअखेर आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीजवळ 73806 वर बंद भाव दिला.

* चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था वृद्धीदर जगात सर्वाधिक म्हणजे 8.4 टक्के राहिला. मागील सहा तिमाहींचा हा उच्चांकी वृद्धीदर ठरल्याचे पाहावयास मिळाले. भारत सरकारच्या सांख्यिकी विभागाने आकडे जाहीर करताच अनेक अर्थतज्ज्ञ तसेच विदेशी पतमानांकन संस्थांना आश्चर्याचा धक्का बसला. बहुतांश अर्थविश्लेषक तसेच संस्थांनी 7 टक्क्यांवर वृद्धीदर राहण्याचे भाकीत केले होते; परंतु त्याहीपेक्षा अधिक वाढ अर्थव्यवस्था वृद्धीदरात पाहावयास मिळाली. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने भारताच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थव्यवस्था वृद्धीदराचा अंदाज आता 7.3 टक्क्यांवरून 7.6 टक्क्यांवर वाढवला. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या विश्लेषणानुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, चीन यांसारख्या आर्थिक महासत्तांचे अर्थव्यवस्था वृद्धीदर 5 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज असून, भारत जगात सर्वाधिक चांगली कामगिरीसह अव्वल क्रमांकावर राहील.

* भारत सरकारच्या केंद्रिय मंत्री मंडळाने सेमीकंडक्टर चीप बनवण्याच्या विविध प्रकल्पांना हिरवा कंदील दर्शवला. एकूण तब्बल 1 लाख 26 हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली. यामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा 91 हजार कोटींच्या प्रकल्पाचा समावेशदेखील आहे. टाटांचा हा प्रक्ला तैवानच्या ‘पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्म’ या कंपनीसोबत भागीदारीमध्ये आहे. याचसोबत टाटांचा आणखी एक 27 हजार कोटींचा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंगचा प्रकल्प व सीजीपॉवर कंपनीचा जपान व थायलंडमधील कंपनीसोबतचा 7600 कोटींचा प्रकल्प यांना मान्यता मिळाली. भारतातील आयटी क्षेत्राप्रमाणे इलेक्ट्रॉनिक चीप बनवण्यामध्ये जागतिक स्तरावर ठसा उमटवण्याच्या द़ृष्टीने भारत सरकारने एकूण 1 लाख 49 हजार कोटींच्या प्रकल्पांना आतापर्यंत मान्यता दिली.

* मनोरंजन क्षेत्रातील कंपनी वॉल्टडिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीज एकत्र येणार. रिलायन्सची व्हायकॉम 18 आणि वॉल्टडिस्नेची स्टार इंडिया एकत्रित येऊन 8.5 (7 हजार 200 कोटी रु.) अब्ज डॉलर्सची बलाढ्य मनोरंजन कंपनी बनवणार. रिलायन्स यामध्ये आणखी 1.4 अब्ज डॉलर्सची (सुमारे 11500 कोटी) गुंतवणूक करणार. एकत्रीकरण पश्चात तयार होणार्‍या कंपनीमध्ये रिलायन्सचा 16.34 टक्के, व्हायकॉमचा 46.82 टक्के आणि डिस्नेचा 36.84 टक्के हिस्सा असेल. याच्या प्रमुखपदी नीता अंबानी आणि उपप्रमुखपदी उदय शंकर हे असतील.

* डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत भारतातील थेट विदेश गुंतवणूक (एफडीआय) 16.3 टक्के वधारून 11.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. एकट्या ऑक्टोबर महिन्यात भारतात 6.3 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक आली.

* भांडवल बाजारातील मिड आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांबाबत बाजारनियामक सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना सतर्क राहण्याचे संकेत दिले. यासंबंधी सेबीने असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडिया या (अ‍ॅम्फी) या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या समितीकडे चर्चा केली. सध्या मिड आणि स्मॉल कॅप प्रकारातील कंपन्यांचे बाजारमूल्य (Valuation) बर्‍यापैकी वाढले आहे. अगदी सेबीने पोर्टफोलिओ मॅनेजर्सना दिले. बाजार पडल्यास म्युच्युअल फंडांचे धोरण काय असणार यासंबंधी आखणी करून गुंतवणूकदारांचे हित जोपासले जाईल. याची तजवीज करण्याची सूचना सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना दिली.

* आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार उद्योगसमूह केकेआर अँड कंपनी भारतीय कंपनीमधील आपला 53.8 टक्के हिस्सा विक्रीसाठी प्रयत्नशील. जेबी फार्मा असे औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनीचे नाव असून हा हिस्सा 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 25 हजार कोटी)च्या जवळपास असण्याचा अंदाज आहे.

* व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने 20 हजार कोटींच्या निधी उभारणीसाठी मंजुरी दिली. एकूण 45 हजार कोटींचा निधी उभारण्यासाठी सध्या कंपनी प्रयत्नशील आहे. इक्विटी आणि रोख्यांच्या माध्यमातूनच हा निधी उभा केला जाणार. कंपनीवर सध्या एकूण 2 लाख 15 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यापैकी 90 टक्के थकीत कर्ज हे ध्वनिलहरींचे (स्पेक्ट्रम) थकीत भाडे व दंडापोटी देणे बाकी आहे. मागील नऊ महिन्यात कंपनीने सुमारे 1 कोटी 7 लाख ग्राहक गमावले आहेत.

* फेब्रुवारी महिन्यात वस्तू व सेवा कर संकलनाद्वारे सरकारला एकूण 1 लाख 68 हजार कोटींचा महसूल प्राप्त झाला. मागील वर्षाशी तुलना करता, महसुलात 12.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मागील वर्षी याच महिन्यात 1 लाख 49 हजार कोटींचे करसंकलन झाले होते.

* गुगलने प्लेस्टोअरमधून अनेक नामांकित भारतीय कंपन्यांच्या अ‍ॅप्लिकेशन्सना हटवले. सेवा शुक्लाच्या बाबींवर मतभेद झाल्याने अनेक प्रसिद्ध अ‍ॅप्स जसे की शादी डॉट कॉम, नौकरी 99 एकर्स, कुकु एफएम, भारत मॅट्रीमॉनी यांसारखे अ‍ॅप्स हटवण्यात आले. गुगलच्या या मक्तेदारीबाबत अनेक भारतीय कंपन्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्याप्रमाणे ऑनलाईन पैशाची देवघेव करण्यासाठी यूपीआयसारखा भारतीय प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, तसाच अँड्रॉईड होण्याची गरज इन्फोएन कंपनीचे संस्थापक संजीव बिकचंदानी यांनी व्यक्त केली.

* यूपीआयच्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांची संख्या फेब्रुवारी महिन्यांत 12.1 अब्जांवर पोहोचली. मागील वर्षाशी तुलना करता व्यवहारांमध्ये तब्बल 61 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. एकूण व्यवहार मूल्याचा (Transaction Valuation) विचार करता व्यवहार मूल्यात 48 टक्क्यांची वाढ होऊन व्यवहारमूल्य 18.3 लाख कोटींवर पोहोचले.

* 23 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.98 अब्ज डॉलर्स वधारून 619.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

Back to top button