Stock Market Closing Bell | Sensex ची ‘गगनभरारी’! तब्बल १,२४५ अंकांनी वाढून बंद, तेजीमागे होते ‘हे’ ४ घटक | पुढारी

Stock Market Closing Bell | Sensex ची 'गगनभरारी'! तब्बल १,२४५ अंकांनी वाढून बंद, तेजीमागे होते 'हे' ४ घटक

पुढारी ऑनलाईन : जीडीपीत झालेली वाढ आणि जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर शेअर बाजाराने आज शुक्रवारच्या व्यवहारात रेकॉर्डब्रेक तेजी अनुभवली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी वाढून ७३,८०० वर गेला. सेन्सेक्सचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. त्यानंतर सेन्सेक्स १,२४५ अंकांनी वाढून ७३,७४५ वर बंद झाला. सेन्सेक्सची आजची वाढ १.७२ टक्के एवढी आहे. तर निफ्टीने आज इंट्रा डे २२,३५३ अंकांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर निफ्टी ५० निर्देशांक ३५५ अंकांनी म्हणजेच १.६२ टक्क्यांनी वाढून २२,३३८ वर बंद झाला.

क्षेत्रीय पातळीवर मेटल निर्देशांक ३ टक्क्यांनी वाढला. बँक, कॅपिटल गुड्स, ऑईल आणि गॅस प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे हेल्थ केअर निर्देशांक १ टक्क्यांनी आणि आयटी निर्देशांक ०.५ टक्क्यांनी खाली आला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.८ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.६ टक्क्यांनी वाढला.

गुंतवणूकदारांनी कमवले ४.१५ लाख कोटी

बाजारातील आजच्या रेकॉर्डब्रेक तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ४.१५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना ४.१५ लाख कोटींचा फायदा झाला. २९ फेब्रुवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३,८७,९५,६९०.२३ कोटी रुपये होते. ते आज १ मार्च रोजी ३,९२,१०,९७९.१३ कोटींवर पोहोचले.

टाटा स्टीलचा शेअर्स टॉप गेनर्स

सेन्सेक्स आज ७२,६०६ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७३,८०० अंकावर जाऊन नवा उच्चांक नोंदवला. सेन्सेक्सवर टाटा स्टीलचा शेअर्स टॉप गेनर्स होता. हा शेअर्स तब्बल ६ टक्क्यांनी वाढून १४९ रुपयांवर गेला. एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, मारुती, एसबीआय, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स, एम अँड एम हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले. तर एचसीएल टेक, इन्फोसिस, सन फार्मा हे शेअर्स घसरले.

तर निफ्टी ५० निर्देशांक आज २२,०४८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २२,३५३ पर्यंत वाढला. निफ्टीवर टाटा स्टील, एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, इंडसइंड बँक हे टॉप गेनर्स राहिले. तर डॉ. रेड्डीज, सन फार्मा, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस २ टक्क्यांहून अधिक वाढले.

१. अर्थव्यवस्था मजबूत, जीडीपीत वाढ

३१ डिसेंबर २०२३ अखेरच्या तिमाहीत भारताचा जीडीपी दर ८.४ टक्क्यांवर गेल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. २०२३-२४ या चालू वर्षात देशाचा जीडीपी ७.६ टक्क्यांवर जाणार असल्याचे सरकारने म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सांख्यिकी विभागाने (एनएसओ) जीडीपीसंदर्भातील अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला. त्यात म्हटल्यानुसार, गेल्या वित्तीय वर्षात भारताचा विकास दर ७ टक्क्यांवर राहिला आहे. ३१ डिसेंबरअखेरच्या तिमाहीत विकास दर ८.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दीड वर्षात प्रथमच जीडीपी उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीतील जीडीपी गेल्या वर्षातील जीडीपी दराहून अधिक आहे. गेल्या तीन वर्षात ७.६ टक्क्यापर्यंत जीडीपी पोहोचला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजापेक्षाही विकास दर चांगला राहणार आहे. बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात चालू वर्षी तेजी पाहावयास मिळणार असल्याने विकास दर झेपावण्यास मदत होणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे. सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएसओच्या अहवालानंतर व्यक्त केली होती.

२. अमेरिकेतील महागाईत घट

अमेरिकेतील महागाई हळूहळू कमी होत असल्याने जूनमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची आशा कायम राहिली आहे. अमेरिकेतील महागाईत जानेवारीपर्यंत २.४ टक्क्यांनी घट झाली आहे.

३. जागतिक बाजारातही उत्साह

अमेरिकेच्या शेअर बाजारातील एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक कंपोझिट हे निर्देशांक काल गुरुवारी उच्चांकी पातळीवर बंद झाले होते. अमेरिकेतील निर्देशांक काल वाढून बंद झाल्यानंतर आशियाई बाजारातही पॉझिटिव्ह ट्रेंड दिसून आला. जपानच्या निक्केईने शुक्रवारी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. फॅक्टरी डेटानंतर चीनचा CSI 300 निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढला. तर हाँगकाँगचा Hang Seng निर्देशांकही उंचावला.

४. परदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा खरेदीवर जोर

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात खरेदीचा मूड दिसून येत आहे. गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ३,५६८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २३० कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याआधीच्या महिन्यात देशांतर्गत शेअर बाजारातून सुमारे २५ हजार कोटींची रक्कम काढून घेतल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये ५,१०७ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली आहे.

हे ही वाचा ;

Back to top button